स्वाइन फ्लूने हादरली उपराजधानी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मार्च 2019

शहरात स्वाइन फ्लूचा प्रकोप सुरूच आहे. अवघ्या ७ दिवसांत संशयित स्वाइन फ्लूच्या बाधेने तब्बल १३ मृत्यू झाल्यामुळे उपराजधानी हादरली आहे.

नागपूर - शहरात स्वाइन फ्लूचा प्रकोप सुरूच आहे. अवघ्या ७ दिवसांत संशयित स्वाइन फ्लूच्या बाधेने तब्बल १३ मृत्यू झाल्यामुळे उपराजधानी हादरली आहे. शनिवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयात झालेल्या मृत्यू विश्‍लेषण समितीच्या (डेथ ऑडिट कमिटी) बैठकीत स्वाइन फ्लूच्या १३ मृत्यूंवर चर्चा करण्यात आली असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. 

सोमवारच्या बैठकीत या मृत्यूंवर चर्चा होऊन नेमके मृत्यू कशामुळे झाले, यावर शिक्कामोर्तब होईल. उपराजधानीत आरोग्याची दयनीय अवस्था आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग स्वाइन फ्लूने होणारे मृत्यू उघड्या डोळ्यांनी बघत आहे. विशेष असे की, अवघ्या तीन महिन्यांत नागपूर विभागात स्वाइन फ्लूने ३२ मृत्यूंची नोंद झाली. यापैकी २० मृत्यू हे शहरातील असून महापालिकेचा आरोग्य विभाग ढिम्म आहे. अलीकडेच वाडी येथे काविळीच्या उद्रेकातून ४ जणांचा मृत्यू झाला होता. शहरात रस्ते गुळगुळीत होत आहेत; मात्र आरोग्यसेवा कोलमडली आहे.

मागील आठवड्यात १ जानेवारी ते २३ मार्चपर्यंत स्वाइन फ्लूच्या मृत्यूचा आकडा नागपूर विभागात १९ वर होता. यानंतर नागपुरातील खासगी रुग्णालयांतील मृत्यूचा आकडा अचानक फुगला आहे. ७ दिवसांत १३ मृत्यूची नोंद झाली असल्याचे मृत्यू विश्‍लेषण समितीपुढे चर्चेला आले असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. 

खासगीतही अतिदक्षता विभागात उपचार 
शहराचा पारा ४३ अंशांवर गेल्यानंतरही स्वाइन फ्लूची दहशत कायम आहे. मृत्युसत्र वाढले आहे. गेल्या सात दिवसांत स्वाइन फ्लूच्या बाधेने १३ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ३२ वर पोहोचली. तर आणखी वीसच्या वर रुग्णांवर खासगी रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याखेरीज स्वाइन फ्लूसदृश लक्षणे आढळल्याने मध्य प्रदेशातील २५, पश्‍चिम बंगालमधील १, अमरावती येथील १९ तर यवतमाळ येथील २ रुग्ण नागपुरात उपचाराला आले होते, हे विशेष. आरोग्य उपसंचालक कार्यालयात शनिवारी मृत्यू विश्‍लेषण समितीच्या आढावा बैठकीत महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी, मेडिकलमधील मेडिसीन विभागासह बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रतिनिधी हजर होते.

Web Title: Swine Flu Sickness Health Care