ताडोबा-अंधारी मे महिन्यापर्यंत हाउसफुल्ल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण गरम होत असताना विदर्भात पाऱ्याचा आलेखही चढू लागला आहे. उन्हाळ्यात दुपारी रस्तेही ओस पडत असले तरी पर्यटकांनी वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे. ३१ मेपर्यंत प्रकल्पातील बुकिंग हाउसफुल्ल झाले आहे.

नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण गरम होत असताना विदर्भात पाऱ्याचा आलेखही चढू लागला आहे. उन्हाळ्यात दुपारी रस्तेही ओस पडत असले तरी पर्यटकांनी वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे. ३१ मेपर्यंत प्रकल्पातील बुकिंग हाउसफुल्ल झाले आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात देश-विदेशातील पर्यटकांचा ओघ वाढतो आहे. राज्यात  सर्वाधिक वाघांची संख्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहेत. त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती व्याघ्र पर्यटनात ताडोब्यालाच असते. पेंच, मेळघाट, बोर आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पांपेक्षा पुन्हा एकदा ताडोब्यालाच पर्यटकांनी पसंती दिलेली आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळाने मोहर्ली प्रवेशद्वारावर कॅंटरची सोय केलेली आहे. त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विदर्भातील तप्त उन्हाळ्यात निसर्गप्रेमी पर्यटकांचा जंगल पर्यटनाकडे कल वाढू लागला आहे. जंगल पर्यटनांचा बेत आखलेल्या पर्यटकांनी ताडोबाच्या कोलारा, मोहर्ली, नवेगाव, खुटवंडा, पांगडी, झरी या सहा प्रवेशद्वाराचे आगाऊ ऑनलाइन बुकिंग करून ठेवले आहे. मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील काही प्रवेशद्वारातील किरकोळ जागांचा अपवाद 
वगळता ३१ मेपर्यंत आरक्षण फुल्ल झाले आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या मुक्त संचारासोबतच आता काळे बिबटही आकर्षणाचे केंद्र  ठरू लागले आहे. त्यामुळेही पर्यटकांनी गर्दी केलेली आहे. यात वाघांशिवाय बिबट, गवा, सांबर, चितळ, रानडुक्कर हे प्राणी आहेत. 
विदर्भातील उन्हाळा तापदायक असला तरी ताडोब्याला त्याचा फटका मागील उन्हाळ्यातही बसला नाही. उलट मे महिनाभर येथे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून आली. 

कोअर क्षेत्राचे प्रवेशद्वार हाउसफुल्ल असताना बफर क्षेत्रातील काही प्रवेशद्वारही हाउसफुल्ल झालेले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पूर्वी सात प्रवेशद्वार होते. आता त्यात तीन सिरकाडा, माखला आणि झरी अशा तीन नवीन प्रवेशद्वारांची भर पडल्याने तो आकडा दहावर गेला आहे. या प्रवेशद्वारावरही आता पर्यटकांची बुकिंगसाठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रातील निसर्ग पर्यटन हाउसफुल्ल झाले आहे.  वेळेवर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी प्रत्येक प्रवेशद्वारावर तत्काळ बुकिंगची सोय आहे.  
- एन. आर. प्रवीण, मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक

Web Title: Tadoba Andhari Tiger Project Tourist Housefull