ताडोबातील वाघांचे छायाचित्र टपाल तिकिटावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

माझ्या एका क्‍लिकला एवढी लोकप्रियता मिळेल, याचा विचारही केला नव्हता. माझ्या मते वनमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे व्याघ्र संवर्धनाला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळाले आहे. 

- अमोल बैस 

नागपूर - चंद्रपूर येथील हौशी वन्यजीव छायाचित्रकार अमोल बैस याचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे गाजलेले छायाचित्र टपाल तिकिटावर प्रकाशित करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या डाक विभागाने घेतला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. जागतिक व्याघ्रदिनानिमित्त (29 जुलै) हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार आहे. 

 

ताडोबाच्या जंगलातील "माया‘ नावाची वाघीण बछड्यावर माया करीत असतानाचे हे छायाचित्र जगभर गाजले. सोशल मीडियावर लाखोंनी या छायाचित्राचे कौतुक केले. छायाचित्रातून प्रगट होणारे ममत्व लक्षात घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याचे टपाल तिकीट प्रकाशित व्हावे व ताडोबाचे व्याघ्रवैभव जगाच्या पाठीवर अधोरेखित व्हावे यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला. केंद्रीय संचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना भेटून ही कल्पना सांगितली. या मागणीचा पाठपुरावा करतानाच व्याघ्रदिनाला टपाल तिकीट प्रकाशित करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला. त्याला प्रतिसाद देत केंद्राने या निर्णयावर मंगळवारी (ता. 26) शिक्कामोर्तब केले. अमोल बैस याचे हे छायाचित्र सर्वांत पहिले इंग्लड येथील "डेली मिरर‘ने प्रकाशित कले. त्यानंतर ते फेसबुकच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. चंद्रपूर येथील आश्रमशाळेत अमोल मुख्याध्यापक असून, 10 वर्षांपूर्वी पालकांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने त्याला ताडोबाची सफर घडायची. याचदरम्यान त्याला छायाचित्रणाचा छंद जडला, हे विशेष. 

 

 

यापूर्वीही तीन टपाल तिकिटे 

यापूर्वी वनमंत्र्यांनी तीन महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या टपाल तिकिटासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज, 1858 च्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सरकारशी झुंज देत शहीद झालेले क्रांतिवीर बाबूराव पुलेश्‍वर शेडमाके व आनंदवनाच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांच्या जीवनात आनंद फुलविणारे थोर समाजसेवक कर्मयोगी बाबा आमटे यांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकिट प्रकाशित होण्याचे श्रेयही वनमंत्र्यांनाच जाते.

Web Title: Tadoba Tiger Photo Post ticket