"आमचे वेतन घ्या पण खासदार निधी कापू नका".. खासदार नवनीत राणा यांची मागणी 

सुरेंद्र चापोरकर 
Wednesday, 16 September 2020

संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे.यासाठी खासदार वेतनातून व इतर भत्ते तसेच निवृत्ती वेतन यामधून 30%कपात करण्याचा प्रस्ताव आहे.

नागपूर : कोरोना आणि महापूर अशा दुहेरी संकटांचा सामना गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील नागरिकांनी केला आहे. त्यात राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. मात्र अजूनही म्हणावी तशी मदत हवालदिल नागरिकांना मिळू शकली नाहीये. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. लोकसभा अधिवेशनात खासदार वेतन-भत्ते व निवृत्ती वेतन सुधारणा विधेयकावर चर्चा करतांना एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी हाथ घातला. त्यावर सडेतोडपणे सभागृहात आपले म्हणणे मांडले.

CBI, CID, NIA आणि  IB मध्ये नेमका फरक काय? सुशांतची केस CID कडे का दिली नाही? जाणून घ्या

संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे.यासाठी खासदार वेतनातून व इतर भत्ते तसेच निवृत्ती वेतन यामधून 30%कपात करण्याचा प्रस्ताव आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ बोलतांना खासदार नवनीत रवी राणा यांनी पीठासीन सभापतींना विनंती केली की खासदार म्हणून आपल्याला मिळणारे वेतन व इतर भत्ते पूर्ण कपात करून कोविड 19 साठी वापरा,

परंतु मतदार संघाचे विकासासाठी आम्हाला मिळणार वार्षिक 5 कोटी रुपयांचा खासदार निधी मात्र पूर्ण द्या, कारण हा निधी स्थानिक कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी,  रुग्णवाहिका घेण्यासाठी व मतदार संघातील इतर आवश्यक विकासकामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतो. 

सद्यस्थिती मध्ये जिल्हाधिकारी सांगतात की केंद्र शासनाचे नवीन निर्देश व मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सध्या खासदार निधीचा वापर करता येणार नाही, त्यामूळे मतदारसंघातील प्रलंबित समस्या सोडविताना अडचणी निर्माण होत आहेत व लोकांची गैरसोय होत आहे करिता इतर खर्चांमध्ये कपात करून स्थानिक लोकांच्या सेवेसाठी पूर्ण खासदार निधी वापरण्याची मुभा मिळावी अशी आग्रही मागणी आज खासदार नवनीत रवी राणा यांनी लोकसभेत केली. सोबतच या महामारीत आपण आपला खासदारकीचा  संपूर्ण पगार देण्यासाठी तयार आहोत व इतर खासदारांनी सुद्धा आपला पगार द्यावा अशी सूचनाही त्यांनी सभागृहात केली.

लोकसभेत संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन दुरुस्ती विधेयक 2020 मंजूर केले गेले. यानुसार खासदारांचे 30 टक्के वेतन पुढील वर्षासाठी कापले जाणार आहे. यावर बोलताना नवनीत राणा यांनी खासदारांचा पगार घ्या, पण खासदार निधी कापू नका, अशी विनंती केली आहे. खासदार निधीतूनच विकासकामे होत असतात त्यामुळे हा निधी कापू नका असे राणा यांनी स्पष्ट केले. 

'डायमंड क्रॉसिंग' बघितले आहे का? देशातील एकमेव हिऱ्यासारखा दिसणारा रेल्वेमार्ग; वाचा सविस्तर

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून  काढल्या प्रकरणी शिवसैनिकांनी माजी सैन्य अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. या प्रकरणात  लक्ष घालत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करावी यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन निवेदन दिले.     

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take MP salaries but do not cut MP funds said Navneet Rana