esakal | संचारबंदीत पोलिसांच्या व्यस्ततेचा गैरफायदा घेत "ते' करतात "असे' काम... 
sakal

बोलून बातमी शोधा

Daru Batti

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. लोकांनी याचे काटेकोर पालन करावे यासाठी पोलीस यंत्रणा सतत प्रयत्न करीत आहे. पण ही संचारबंदी पायदळी तुडवत जिल्ह्याच्या काही भागात दारूविक्रेते मोठ्‌या प्रमाणात मोह आणि गुळाची दारू गाळून त्याची विक्री करीत आहेत.

संचारबंदीत पोलिसांच्या व्यस्ततेचा गैरफायदा घेत "ते' करतात "असे' काम... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : लॉकडाउनचा फायदा घेत दारू तस्कर, सागवान तस्कर तसेच गावठी दारू विक्रेत्यांनी धुडगूस घातल्याचे दिसून येत आहे. पोलिस यंत्रणा कोरोनाच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेत तस्करांनी जिल्ह्यात हातपाय पसरले आहे. सिरोंचा तालुक्‍यात दारू गाळणाऱ्या भट्ट्यांवर मुक्तिपथ तालुका चमू आणि सिरोंचा पोलिसांनी धाड टाकून मोठ्‌या प्रमाणात दारू व सडवा नष्ट केला. सोबतच काही विक्रेत्यांकडून विदेशी दारूही जप्त केली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. लोकांनी याचे काटेकोर पालन करावे यासाठी पोलीस यंत्रणा सतत प्रयत्न करीत आहे. पण ही संचारबंदी पायदळी तुडवत जिल्ह्याच्या काही भागात दारूविक्रेते मोठ्‌या प्रमाणात मोह आणि गुळाची दारू गाळून त्याची विक्री करीत आहेत. सिरोंचा तालुक्‍यात गाव संघटनांकडून ही माहिती मुक्तिपथ तालुका चमूला मिळताच त्यांनी रामांजपूर, जानमपल्ली माल, नंदीगाव आणि रंगयापल्ली येथे पोलिसांच्या सहकार्याने धाड मारून मोठ्‌या प्रमाणात गावठी दारू नष्ट करून दारूभट्ट्या उद्‌ध्वस्त केल्या. सिरोंचा शहरासह तालुक्‍यात तेलंगणातून अनेक मार्गाने विदेशी दारूची तस्करी होते. पण लॉकडाउनमुळे ही तस्करी काहीशी कमी झाली आहे. परिणामी शहरात गावठी दारूची विक्री मोठ्‌या प्रमाणात होत आहे. हे निदर्शनास येताच मुक्तिपथ आणि पोलिसांनी शहरातील चार प्रभागात धाड टाकून सहा जणांच्या घरून गावठी व विदेशी दारूचे साठे जप्त केले. 

अवश्य वाचा-  ट्रॅक्टरने शेतात जायला निघाला शेतकरी, पण वाटेतच काळाने घातली झडप

नदीमार्गे होणारी दारूची तस्करी धोक्‍याची

तेलंगणा राज्यातून नदीमार्गे मोठ्‌या प्रमाणात विदेशी दारूची आयात सिरोंचा तालुक्‍यात होते. लपून छपून जिल्ह्यात त्याची तस्करी होते. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्याने ही तस्करी कमी झाली असली तरी ती पूर्णतः थांबलेली नाही. उन्हामुळे वैनगंगा नदीचे पाणी सध्या खूपच कमी झाले आहे. परिणामी नदीमार्गे दारूची तस्करी सहज होऊ शकते आणि ती धोक्‍याचीही ठरू शकते. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.