कॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

नागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केवळ दलितांची मते लाटण्याचे काम केले, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केला. भाजपबाबत दलितांची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहनही त्यांनी केले.

नागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केवळ दलितांची मते लाटण्याचे काम केले, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केला. भाजपबाबत दलितांची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहनही त्यांनी केले.
येथील कस्तुरचंद पार्कवर भाजपतर्फे रविवारी आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दुष्यंत गौतम, महापौर नंदा जिचकार यांच्यासह विदर्भातील सर्व आमदार, खासदार, राष्ट्रीय नेते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. रामायण, महाभारतासारखे ग्रंथ लिहिणारे वाल्मीकी, महर्षी व्यास हे दलित होते, असे नमूद करीत ते म्हणाले, नागपूरच्या भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेऊन दलितांची चेतना जागविली तर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय चेतना जागविण्याचा पाया रचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन भारताची निर्मिती करीत असून दलितांच्या सहभागाशिवाय ते शक्‍य नाही. भाजप सरकारने दलित, शोषितांचा स्तर उंचावण्याचे काम केले. परंतु, काही राष्ट्रविरोधी शक्ती दलितांना इतर समाजापासून विलग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नमूद करीत त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या डॉ. बाबासाहेबांच्या विचारावर भाजप सरकार काम करीत आहे. कॉंग्रेसच्या 55 वर्षांच्या तुलनेत मोदींच्या 55 महिन्यांच्या कार्यकाळाची देशाच्या अर्थव्यवस्थेला गती आली. 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पहिल्या तीन क्रमांकात असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी, सुशासन व अंत्योदय यावर भाजपची विचारधारा असून गरिबांची सेवा करणारी संघासारखी संघटना कुठल्याही पक्षाकडे नाही. या देशाचा समतोल विकास केवळ भाजपच करू शकते, असेही ते म्हणाले. संचालन भाजप अनुसूचित जाती आघाडीचे शहराध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.
कॉंग्रेसचे पितळ उघडे पाडा ः गडकरी
भाजप सरकार "सबका साथ, सबका विकास' या विचारावर प्रामाणिक काम करीत आहे. मात्र, भाजप दलित, मुस्लिमविरोधी असल्याचा अपप्रचार कॉंग्रेसकडून केला जात आहे. मतांसाठी समाजात भीती निर्माण करीत असून कॉंग्रेसचे पितळ उघडे पाडा, असे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केले.
सत्तेच्या हव्यासापोटी महाआघाडी ः फडणवीस
भाजपविरोधात जे 18-19 पक्ष एकत्र आले, ते सामाजिक न्यायासाठी नव्हे तर सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. कॉंग्रेस नेत्यांनी बापाच्या स्मारकाला जागा दिली. मात्र, डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा दिली नाही, असेही ते म्हणाले.
गडकरींच्या भाषणात विदर्भवाद्यांचा गोंधळ
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाषणासाठी उभे राहताच पुढे बसलेल्या चार विदर्भवाद्यांनी "वेगळा विदर्भ झालाच पाहिजे', अशा घोषणा देत पत्रके फेकली. या चौघांनाही पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. गडकरी यांनी यावेळी त्यांना कॉंग्रेसने पाठविले आहे, असे अडथळे येतातच, असे ताशेरे ओढले.

 

Web Title: taking votes in the name of Dr. Ambedkar: Rajnath Singh