टॅलाॅट मलम हानिकारक!; विक्रेत्यांकडे आढळल्यास होणार कारवाई

भगवान वानखेडे
बुधवार, 12 जून 2019

  • टॅलाॅट मलम विक्रेत्यांकडे आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाचे कारवाईचे आदेश 
  • हिमाचल प्रदेशमधील स्वीस्कम हेल्थकेअर नावाची कंपनी तयार करते मलम

अकोला : त्वचेसाठी वापरण्यात येणाऱ्या टॅलॉट नावाचा मलम हानिकरक असल्याचे प्रमाण चाचणीनंतर पुढे आले आहे. तेव्हा जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना हा मलम विकण्यांवर बंदी घालण्यात आली असून, ज्यांच्याकडे या औषधीचा साठा आढळेल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

टॅलाॅट या त्वचेसाठी वापरण्यात येणारा मलम हिमाचल प्रदेशमधील पुणा जिल्ह्यातील बाथ्री गावात स्वीस्कम हेल्थकेअर नावाची कंपनी तयार करते. हा मलम फेब्रुवारी 2018 ला तयार करून बाजारात विक्रीसाठी आणले होते. या मलमची एक्सापायरी तारीख ही 2020 आहे. या औषधाचे नमुने दवा बाजारमधील जलाराम मेडीसर्जमधून चाचणीसाठी घेण्यात आला होता. तो नमुना शासकीय विश्लेषक मुंबई यांनी अप्रमाणित घोषित केला आहे. यानुसार ज्या औषध विक्रेत्यांकडे या औषधाचा साठा शिल्लक असेल त्यांनी त्वरीत त्याची विक्री थांबवून साठा पुरवठादारास परत करावा व तसे न केल्यास त्या औषध विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांनी दिली आहे. 

आतापर्यंत अप्रमाणित घोषित औषध -
वर्ष 2018 ते 2019 या वर्षात अन्न व औषध प्रशासनाने आतापर्यंत ओझॉल डी टॅबलेट्स, बेस्टीझाईन सायरप, मेट्रोझी बॅबल्टेस, ऍसीमाॅल एसपी टॅबलेट्स, रॅबेगार्ड टॅबलेट्स, पॅन्टोसेक टॅबलेट्स, ॲसेक एसपी टॅबलेट्स, रॅबसेक 2.0 टॅबलेट्स, व्हरिवॅक टॅबलेट्स, पॉवरगीन टॅबलेट्स अशा दहा प्रकारच्या औषधाचे नमुने घेऊन चाचणीनंतर ते अप्रमाणित आढळल्याने त्यांची विक्री बंद करण्यात आली आहे. यामध्ये टॅलाॅट नावाच्या मलमाची भर पडली आहे. 

होऊ शकतो परवाना निलंबित -
ज्या औषध चाचणीनंतर अप्रमाणित घोषीत केल्या आहेत, अप्रमाणित घोषीत केल्यानंतरही त्या औषधाची विक्री होत असेल तर त्या औषध विक्रेत्यांचा परवाना निलंबीत होऊ शकतो. तेव्हा अशा औषधांची विक्री न करण्याचे आवाहन औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त हेमंत मेटकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tallat ointment is harmful Action will be taken if vendors have it