गावांचा टॅंकरमुक्त "श्‍वास'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

अमरावती,: पाणीटंचाईने व्याकूळ झालेल्या गावांची तहान सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे टॅंकरच्या गडद छायेतून 54 गावे बाहेर पडली असून आता केवळ 9 गावांमध्येच टॅंकर सुरू आहे. निसर्गाने उशिरा का होईना दाखविलेल्या तत्परतेमुळे अनेक गावांनी टॅंकरमुक्त श्‍वास घेतला आहे.

अमरावती,: पाणीटंचाईने व्याकूळ झालेल्या गावांची तहान सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे टॅंकरच्या गडद छायेतून 54 गावे बाहेर पडली असून आता केवळ 9 गावांमध्येच टॅंकर सुरू आहे. निसर्गाने उशिरा का होईना दाखविलेल्या तत्परतेमुळे अनेक गावांनी टॅंकरमुक्त श्‍वास घेतला आहे.
यंदाच्या पाणीटंचाईने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळविले. फेब्रुवारीपासूनच ग्रामीण भागाला टंचाईचे चटके सोसावे लागले. यंदा पाणीटंचाई कृती आराखडासुद्धा लवकर तयार करण्यात आला. विशेष म्हणजे तब्बल 12 कोटींचा हा आराखडा होता. मार्च, एपिलपर्यंत विहिरी तसेच नद्यांनी तळ गाठले. ग्रामीण भागातील नागरिकांना दूरून वाड्यांवरून पाणी आणण्याइतपत स्थिती मार्च एप्रिलमध्येच निर्माण झाली आहे. त्यानंतर मे, जूनमध्येसुद्धा तीव्र स्वरुपाची टंचाई कायम होती. जिल्ह्यात जूनपर्यंत 54 गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. मेळघाटातील तब्बल 35 ते 40 गावांना टॅंकर लावण्यात आले होते, तर 250 पेक्षा अधिक गावांमध्ये तीव्र स्वरूपाची टंचाई जाणवली. मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मेळघाटातील नदी, नाले ओसंडून वाहत असून अनेक गावांची तहान भागली आहे. विहिरींचा जलस्तर वाढला असून जलस्त्रोतांचे पुनर्भरणसुद्धा झाले. त्यामुळे मेळघाटातील 9 गावे वगळता अन्य ठिकाणचे टॅंकर बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जुलैमध्येसुद्धा पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाई आराखड्याला मुदतवाढ देण्यात आली होती.

मेळघाटातील बहुताश गावांतील टॅंकर बंद करण्यात आले असून सद्य: 9 गावांत टॅंकर सुरू आहे. या गावांमध्ये जलस्त्रोताचे पुर्नभरण अद्यापही झालेले नाही. टंचाई पूर्णतः संपली असे नाही. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे त्या गावांकडून तसे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार उपाययोजना केली जाईल.
- के.टी. सावळकर (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प. )

पाणीटंचाई निर्मूलन आराखड्यात यंदा नवीनयोजनांची विशेष दुरुस्ती, बंद हातपंप दुरुस्त करणे, नवीन विंधन विहिरी, विहिरींचे अधिग्रहण, तसेच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा अशा योजना राबविण्यात आल्या. टॅंकर वगळता तूर्तास सर्व योजना बंद झाल्या आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanker-free "breath" of villages