Video : जाहिरात ठरली 'नाकापेक्षा मोती जड'

दीपक खेकारे-नीलेश झाडे
Thursday, 26 December 2019

निवडणूक म्हटली की बॅनरबाजी ठरलेलीच. मात्र, गडचांदूर नगर परिषदेसाठी उभे असलेल्या उमेदवारांसाठी बॅनरबाजी डोईजड ठरली आहे. बॅनरवर नगर परिषदेने आकारलेल्या जाहिरात करामुळे आठशे रुपयांचा बॅनरवरील कर तब्बल बाराशे रुपयांवर गेला आहे. नगर परिषदेने आकारलेला कर म्हणजे "नाकापेक्षा मोती जड' झाल्याची बोचरी टीका आता उमेदवार करीत आहेत. 

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनही भाजपला सरकार स्थापन करता आली नाही, ही बाब वेगळी. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायतीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्ष मूळ घट्ट करण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे नवे समिकरण पाहायला मिळणार आहे. सर्वत्र याची चर्चा असताना गडचांदूर नगर परिषद वेगळ्याच कारणानी चर्चेचा विषय झाली आहे. 

निवडणूक म्हटली की रॅली, नारे-निदर्शने व बॅनरबाजी आलीच. याशिवाय आपण निवडणुकीची कल्पनाच करू शकत नाही. अनंतकाळापासून हेच चालत आले आहेत. आता सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असला तरी गावांत पाहिजे त्या प्रमाणात याचा वापर होताना दिसत नाही. बॅनर, बिल्ले, फ्लॅक्‍सवरच उमेदवारांचा अधिक भर असतो. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर जिल्हा परिषद बॅनरमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. 

निवडणूक म्हटली की बॅनरबाजी ठरलेलीच. गडचांदूर नगर परिषदेसाठी उभे असलेल्या उमेदवारांसाठी मात्र; बॅनरबाजी डोईजड ठरली आहे. बॅनरवर नगर परिषदेने आकारलेल्या जाहिरात करामुळे आठशे रुपयांचा बॅनरवरील कर तब्बल बाराशे रुपयांवर गेला आहे. नगर परिषदेने आकारलेला कर म्हणजे "नाकापेक्षा मोती जड' झाल्याची बोचरी टीका आता उमेदवार करीत आहेत. 

 बापरे! - विद्यार्थ्यांच्या नाश्‍त्यात आढळल्या अळ्या, लेंड्या

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नऊ जानेवारीला होऊ घातलेली आहे. निवडणुकीसाठी 103 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेले आहेत. अपक्षांनीही कंबर कसली आहे. बॅनरबाजीने निवडणुकीचे वातावरण तापू लागले असतानाच नगर परिषदेच्या निर्णयाने मात्र उमेदवार खचले आहेत. 

नगर परिषदेने बॅनरवर प्रति स्केअर फिट 15 रुपये जाहिरात कर लावला आहे. यामुळे आठशे रुपयांचा बॅनरवर बाराशे रुपयांचा कर उमेदवारांना भरावा लागणार आहे. नगर परिषदेचा जाहिरात कर उमेदवारांना परवडणारा नाही. उमेदवाराचे खिसे रिकामे करण्यासाठी कार्यकर्त्यांत स्पर्धा लागली असते त्यात जाहिरातीसाठी खिसे रिकामे होत असल्याचे बघून उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. 

काय आहे या लिंकमध्ये? - आश्रमशाळा अधीक्षकाने शाळेत घेतला गळफास

उमेदवारांकडून माघार घेण्याची शक्‍यता 
नगर परिषदेने घेतलेला ठराव सर्वसामान्य उमेदवारांच्या खिशाला कात्री लावणारा व अन्याय करणारा आहे. या निर्णयाने अनेक गरीब उमेदवार निवडणुकीतून माघार घेण्याची शक्‍यता आहे. मुख्याधिकारी यांनी सदर ठरावाची अंमलबजावणी न करता नियमानुसार जाहिरात कराची अंमलबजावणी करावी. त्यासाठी त्यांनी इतर नगर परिषदांचा आदर्श घ्यावा. 
- विक्रम येरणे, 
उमेदवार प्रभाग तीन

प्रति स्क्वोअर फिट पंधरा रुपये 
नगर परिषद सभासदांच्या सभेमध्ये शहरामध्ये दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस लावण्यात येणाऱ्या बॅनरवर प्रति स्क्वोअर फिट पंधरा रुपये दर आकारण्याचा ठराव घेण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही सदर ठरावाची अंमलबजावणी करीत आहोत. 
- डॉ. विशाखा शेळकी, मुख्याधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tax more than banner in Chandrapur