10 वर्षांपासून वेतन न मिळाल्याने शिक्षकाची विष प्राशन करून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

- आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शिक्षकाने घरी विष प्राशन करून संपविले जीवन

- गोंदियातील कोहळीटोला येथील घटना. 

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शिक्षकाने घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना कोहळीटोला येथे घडली. केशव रामनाथ गोबाडे (वय 42) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. गोबाडे यांना गेल्या 10 वर्षांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी हे कृत्य केले. 

केशव गोबाडे हे झाशीनगर येथील आदिवासी विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 10 वर्षांपासून विना वेतन कार्यरत होते. वेतन मिळत नसल्याने केशवची पत्नी दोन मुलांसह आपल्या माहेरी राहत होती. एकीकडे पत्नीचे सोडून जाणे आणि दुसरीकडे आर्थिक विवंचना, अशा अवस्थेत नैराश्‍य आलेल्या केशव गोबाडे यांनी टोकाचे पाऊल उचलून गुरुवारी विष प्राशन करून आत्महत्या केली.

केशव यांच्या आत्महत्येची बातमी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृषी समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच अध्यक्ष प्रा. के. बी. बोरकर व त्यांच्या शिष्टमंडळाने गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांची भेट घेतली. केशव यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये देण्यात यावे, अशी मागणी केली. या वेळी डॉ. फुके यांनी शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतरच दुपारी दोनच्या सुमारास केशव यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

विना अनुदानित कृती समिती वेतनासाठी 8 ऑगस्टपासून आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधत आहे. तरीही शासनाला जाग आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर, होतेच शिवाय, शिक्षकदेखील टोकाचे पाऊल उचलत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher suicide who not get Salary from 10 Years in Gondia