तुम्हीच सांगा विषय कसा शिकवायचा?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नागपूर : दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षकांना दैनंदिन पाठ टाचण करण्याची सक्ती करू नये असे आदेश शाळांना देण्यात आले. मात्र, या निर्णयावर आता शिक्षक संघटनांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या दररोजच्या कामाची नोंद किंवा अभ्यासक्रम पूर्ण केला किंवा कसे? शैक्षणिक साहित्याचा वापर केला की नाही? विद्यार्थ्यांना स्वाध्याय कोणता दिला? याबाबतची पडताळणी मुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षकीय यंत्रणा कशी करणार? असे प्रश्‍न आता संघटनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.
भाजप शिक्षक आघाडीने दिलेल्या निवेदनावरून शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना दैनंदिन पाठ टाचण करण्याची सक्ती करू नये असा आदेश काढला. 2015 साली नंदकुमार प्रधान सचिव असताना, त्यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान राबविताना, 22 जून ला गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविताना, मासिक आणि वार्षिक नियोजनावर वेळ वाया घालवू नका असे स्पष्ट केले होते. मात्र, आताच्या आदेशाने विद्या प्राधिकरणाकडून त्याची सक्ती करू नये, असे आदेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दैनंदिन टाचण काढणे ही शिक्षकांना शिकविण्यासाठी उपयुक्त असलेली पद्धत आहे. शिवाय त्याच आधारावर न्यायालयातही शिक्षकांची बाजू मजबूत होत असते. त्यामुळे हा विषय काढता येणे जवळपास अशक्‍य आहे. डी.एड आणि बी.एड. अभ्यासक्रमात या विषयावर स्वतंत्र प्रकरणे आणि परीक्षेत त्यावर प्रश्‍न असतात. अशावेळी हा विषय काढल्यास शिक्षकांवर अन्याय होईल, अशी प्रतिक्रिया शिक्षक संघटनांनी व्यक्‍त केली आहे.

2015 च्या शासननिर्णयात पाठ टाचणाची सक्ती करण्यात येऊ नये असे नमूद असले तरी ते काढण्यातच येऊ नये असे कुठेही म्हटले नाही. पर्यवेक्षकीय यंत्रणेने शिक्षकांच्या टाचणाऐवजी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासावी.
-शरद भांडारकर, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना.

सरकारच्या 22 जून 2015 मधील 13(1) ते 13(4) येथे कुठेही पाठ नियोजन (टाचण) हा शब्द आढळला नाही. तसेच विद्या प्राधिकरण सहसंचालकांनी त्यांच्या पत्रकामध्ये दैनिक पाठ नियोजन रद्द बद्दल उल्लेख केला नाही.
-पुरुषोत्तम पंचभाई, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक संघ.

महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी नियमावली 1981 च्या नियमानुसार "पाठ टाचण' याचा कर्तव्य म्हणून समावेश आहे. त्यामुळे विद्या प्राधिकरणाने काढलेले पत्र काढून दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही.
-पूजा चौधरी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teachers lesson plan