दिवाळीत व्यावसायिकांच्या डोळ्यात आनंदाचे नव्हे दुःखाचे अश्रू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

- लहान व्यावसायिकांचे विदर्भात 100 कोटी तर शहरात 50 कोटींचे नुकसान
- पावसाने ऐन दिवाळीत हजेरी लावल्याने ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली
- कर्ज कसे परत करायचे अशी चिंता व्यावसायिकांसमोर उभी ठाकली

नागपूर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या घास हिरावल्यानंतर आता दिवाळीच्या तोंडावर लहान व्यवसायाला जोरदार फटका बसला आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला व बाजारात बसणाऱ्या लहान व्यावसायिकांचे विदर्भात 100 कोटी तर शहरात 50 कोटींचे नुकसान झाले आहे. 
लहान व्यावसायिक सिझनल व्यवसाय करण्यासाठी पतसंस्था अथवा बॅंकाकडून कर्ज घेतात. कर्जाच्या मदतीने सणासुदीच्या पर्वावर लहान व्यावसायिक बाजारात अथवा रस्त्याच्या शेजारी दुकाने थाटतात. दिवाळीच्या सणाला या व्यावसायिकांचा सर्वाधिक व्यवसाय होतो. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांमध्ये उत्साह असतो. त्यात पणती विक्रेता, लक्ष्मीमूर्ती, लक्ष्मी फोटो, फूलविक्रेते, फटाके, लायटिंग, आकाश कंदील यासह विविध व्यवसायांचा समावेश आहे. यंदा पावसाने ऐन दिवाळीत हजेरी लावल्याने ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली. त्यामुळे लहान व्यावसायिकांकडील साहित्यांची विक्री झालेली नाही. विक्री न झाल्याने आता घेतलेले कर्ज कसे परत करायचे अशी चिंता व्यावसायिकांसमोर उभी ठाकली आहे, असे मत अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी व्यक्त केले. 

""मेरा सब्जी बेचने का धंदा है, मै हर साल दिवाळी में दिये बेचने का काम करता हूँ, दिवाली मे अच्छा धंदा होता है, उस के लिये हम तीन ते चार महिने से तयारी करते हैं. इस साल भी जोर शोर से तयारी की, बॅंक से 50 हजार का कर्जा लिया. उत्पादको से दिये खरेदी थे, चार से पाच दिन अच्छा धंदा रहा, मगर दो दिन पहिले बारीश आई और हमारा धंदा चौपट हो गया, अभी 70 टक्के माल पडा हैं, ये माल कैसे बेचे इसकी चिंता सताई जा रही है. असे दुःखी अंतःकरणाने दिनेश गौर हा व्यावसायिक आपली व्यथा सांगत होता. अशीच स्थिती इतरही व्यावसायिकांची झालेली आहे. त्यामुळे यंदाही दिवाळी आनंदाची नव्हे तर दुःखाची किनार घेऊन आल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 
--- 
दिवाळी हट उभारा 
केंद्र सरकारने सिझनल व्यवसाय करणाऱ्या लहान व्यावसायिकांसाठी शहराच्या मुख्य ठिकाणी दिवाळी हट उभारण्यात याव्या, अशी मागणी आम्ही करणार आहोत. नागपूर शहरात पूर्वी फटाके विक्रेत्यांसाठी कस्तुरचंद पार्क त्यानंतर आता गांधी पुतळा आणि यशवंत स्टेडियमजवळ व्यवस्था करण्यात येते. तशीच व्यवस्था दिवाळीसाठी लागणारे इतरही साहित्य विक्रीसाठी दिवाळी हट उभारण्यात यावी. 
- बी. सी. भरतीया, राष्ट्रीय अध्यक्ष कॅट 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tears of sadness, not tears of joy