वडगावातील गांजाचा धूर धोकादायक; अल्पवयीन मुलेही विळख्यात, पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

सूरज पाटील
Wednesday, 18 November 2020

अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आर्णी रोड व वडगाव रोड परिसरातील भाग येतो. याच परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांकडे पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांची जागा, शाळा, मोकळ्या मैदानांचा गांजा पिणाऱ्यांनी ताबा घेतला आहे.

यवतमाळ : पोलिस अधीक्षकांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरीदेखील ठाणेदारांकडून त्याकडे काणाडोळा केला जात आहे. वरपांगी अवैध व्यवसाय बंद असल्याचे दिसत आहे. मात्र, चोरट्या मार्गाने सर्वकाही सुरळीत सुरू आहे. शहरातील आर्णी रोड व वडगावात गांजाचा निघणारा धूर धोकादायक स्थितीत पोहोचला आहे.

अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आर्णी रोड व वडगाव रोड परिसरातील भाग येतो. याच परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांकडे पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांची जागा, शाळा, मोकळ्या मैदानांचा गांजा पिणाऱ्यांनी ताबा घेतला आहे. अल्पवयीन मुले गांजाच्या आहारी गेल्याने पालकवर्ग चिंतातूर झाला आहे. मुले गांजाचा धूर सोडल्यावर मद्यही प्राशन करतात. त्यानंतर मिळेल त्याठिकाणी राडा घालतात.

हेही वाचा - ग्राहकांची वर्दळ तर कमी होईल, पण कुठेही दिसणार नाही...

शेजारच्या लोकांना मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, या घटना वडगाव रोड परिसरात सातत्याने घडत आहेत. गांजा सेवन करणारी मुले गुन्हेगारी वर्तुळातील लोकांच्या संपर्कात असल्याने कोणीही त्यांना बोलण्याची हिंमत करीत नाही. त्यामुळे गांजा सेवन करणाऱ्यांना आपणच राजे असल्याची अनुभूती येते. गांजा व दारू सेवनामुळे या भागातील सामाजिक स्वास्थ अधिकच बिघडले आहे. दोन वर्षांपूर्वी एलसीबीच्या पथकाने वडगाव रोड परिसरात गांजाचा धूर सोडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर ही विशेष मोहीम मागे पडली. आता तर पोलिसांना माहिती देऊनही छापा टाकण्यात येत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

हेही वाचा - नागपूर पदवीधर निवडणूक : संदीप जोशींसह सात उमेदवारांची माघार, 19 जण रिंगणात

भररस्त्यात राडा - 
गांजा व दारूच्या नशेत असलेल्या टोळक्‍याने सोमवारी (ता.16) रात्री साडेसातच्या सुमारास चक्क कारच्या काचा फोडून नुकसान केले. टोळक्‍याने शिवीगाळ करीत परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. यवतमाळच्या आर्णी नाका परिसरातील एक बँक दुसरीकडे स्थलांतरीत झाली आहे. त्यामुळे या मोकळ्या जागेवर गांजा पिणाऱ्यांनी ताबा घेतला आहे. पाच जणांच्या टोळक्‍यांनी याच परिसरात रोडवर उभ्या असलेल्या कारचे नुकसान केले. यासंदर्भात कोणतीही तक्रार अवधूतवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली नाही. त्यामुळे टोळक्‍यांची परिसरात किती दहशत आहे, हे दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teenagers addicted to smoking in wadgaon of yavatmal