नागपूर पदवीधर निवडणूक : संदीप जोशींसह सात उमेदवारांची माघार, 19 जण रिंगणात

अतुल मेहेरे
Wednesday, 18 November 2020

आता लढती स्पष्ट झाल्याने उमेदवार प्रचाराला लागले आहेत. सर्वच उमेदवारांनी गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया येथून प्राधान्याने प्रचाराला सुरुवात केली आहे. शेवटच्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यात संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.

नागपूर : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार संदीप जोशी आणि अभिजित वंजारी यांनी उमेदवारी दाखल केली होती. भाजपचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना नामसाधर्म्याचा फटका बसण्याची दाट शक्यता होती. पण अपक्ष वंजारी यांचा अर्ज पडताळणीत बाद झाला आणि अपक्ष संदीप जोशी यांच्यासह सात उमेदवारांनी पदवीधरच्या रिंगणातून माघार घेतली. नामसाध्यर्म्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी आणि भाजपचे संदीप जोशी यांच्या मतांमधील विभाजन आता टळले आहे. 

हेही वाचा - पशुपक्षी वनात केला दीपोत्सव साजरा; वनविभाग व पीपल फॉर ऍनिमल्सचा उपक्रम

उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संदीप जोशी (अपक्ष), धर्मेश फुसाटे (अपक्ष), गोकुलदास पांडे (अपक्ष), शिवाजी सोनसरे (अपक्ष), सचिदानंद फुलेकर (अपक्ष), प्रा. किशोर वरभे (लोकभारती) व रामराव ओमकार चव्हाण (अपक्ष) यांनी आपली दावेदारी परत घेतली. याचा फटका आणि फायदा कोणाला होतो, हे निकालाच्या दिवशी कळेल. आता एकूण १९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज मागे घेण्याची शेवटी तारीख होती. 

हेही वाचा - बावनकुळेंनी केलेल्या काळ्या धंद्यामुळेच भाजपने त्यांचे...

पदवीधर निवडणुकीसाठी एक डिसेंबरला मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होईल. या मतदार संघावर आतापर्यंत भाजपचे वर्चस्व राहिले आहे. गेल्यावेळी भाजपने तत्कालीन महापौर अनिल सोले यांना उमेदवारी दिली होती. आता विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसकडून अ‌ॅड. अभिजित वंजारी यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी ३१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील ६ जणांचे अर्ज अवैध ठरले, तर २६ जणांचे अर्ज वैध ठरले होते. यातून आज सातजणांनी माघार घेतली आहे. 

हेही वाचा - खड्डे बुजवा किंवा आम्हाला गाडा; वर्धा जिल्ह्यातील भिडी-पुलगाव रस्त्यासाठी दफन आंदोलन

आता लढती स्पष्ट झाल्याने उमेदवार प्रचाराला लागले आहेत. सर्वच उमेदवारांनी गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया येथून प्राधान्याने प्रचाराला सुरुवात केली आहे. शेवटच्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यात संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. या मतदारसंघात भाजप आजवर अपराजित राहिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही जागा संदीप जोशी यांना कायम राखावी लागणार आहे. काँग्रेसचे अभिजित वंजारी दोन वर्षांपासून येथे मशागत करीत आहे. विधानसभेऐवजी त्यांनी पदवीधरवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. येथे ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे यंदा या मतदारसंघात बसपचा उमेदवार नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी किती मजल मारते, हेसुद्धा निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 candidate take back their nomination from nagpur graduation constituency election