सांगा, आम्ही खेळायचे तरी कसे? 

मनोहर घोळसे
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

सावनेर तालुक्‍याचे ठिकाण आहे. येथील लोकसंख्या सुमारे 50 हजार आहे. त्यातही विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी एकच मैदान आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने क्रीडांगणाची दुरवस्था पाहता तिथे कुणाचीही खेळाची इच्छा होणार नाही.

शहरात केवळ एक मैदान आहे. या मैदानावर काटेरी झाडे, गवत, अस्ताव्यस्त कचरा, घाण पसरलेली आहे. सर्वत्र दुर्गंधी येते. स्टेडियमची दुर्दशा झाली आहे. मैदानाच्या भागात ग्रीन जीमशेजारी दारूच्या बाटल्या पडून असल्याने येथे व्यसनींची मैफल तर रंगत नाही ना, असा प्रश्‍न कुणालाही पडेल. क्रीडासंकुलात सायंकाळी अंधार राहत असल्याने मुलांना घ्यायला येणे महिलांना शक्‍य होत नाही. प्रत्येकाच्या आरोग्यसंवर्धनाच्या मूलभूत प्रश्‍नाकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने आबालवृद्धांसह साऱ्यांमध्ये संताप आहे. 

सावनेर तालुक्‍याचे ठिकाण आहे. येथील लोकसंख्या सुमारे 50 हजार आहे. त्यातही विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी एकच मैदान आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने क्रीडांगणाची दुरवस्था पाहता तिथे कुणाचीही खेळाची इच्छा होणार नाही. स्टेडियमची दुर्दशा, घाण व दुर्गंध असे असतानाही नगरपालिका प्रशासन गंभीर नाही. क्रीडांगणाअभावी विद्यार्थ्यांमध्ये खेळांबाबत रुची दिसत नाही. खेळाव्यतिरिक्‍त मैदानावर मेळा, सभा, कार्यक्रम नेहमीच सुरू असतात. परंतु, कबड्डी, क्रिकेट, खो-खो, हॉलीबॉल, फुटबॉल या खेळांच्या दृष्टीने स्थायी स्वरूपाची चांगली व्यवस्था का केली जात नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 
सायंकाळी मैदानावर विद्युतची व्यवस्था नसते. याच मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू उमेश यादव तसेच माधुरी गुरनुले व स्वाती गुरनुले आदी खेळले आहेत. मात्र, आता मैदानाची स्थिती बघून शहरातील तरुण-तरुणी क्रीडा क्षेत्रात कसे करिअर घडविणार, हा प्रश्‍न पडतो. नगरपालिकेने सोयीसुविधायुक्‍त क्रीडांगण द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

नगर परिषदेने लक्ष द्यावे 
दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत असताना शहरातील एकमेव मैदानाची अतिशय दुरवस्था झाली आहे. सभा, कार्यक्रमासाठी मैदानात खड्डे केले जातात. मात्र, ते तसेच ठेवले जातात. एकीकडे केरकचरा करायचा आणि खेळणाऱ्यांनी स्वच्छता करून खड्डे बुजवायचे, हे नित्याचे झाले आहे. आता मैदानाची स्थिती फारच बिकट आहे. नगर परिषदेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार आणि सामाजिक कार्यकर्ते ऍड. शैलेश जैन यांनी व्यक्‍त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tell us, how do we play?