चंद्रपूर, ब्रह्मपुरी तापले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

लाट कायम - उपराजधानीतही पारा 45.9 अंशांवर

लाट कायम - उपराजधानीतही पारा 45.9 अंशांवर
नागपूर - विदर्भातील उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढत चालल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे पारा 46 अंशांवर गेला असून, उपराजधानीतही कमाल तापमान 45.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हवामान विभागाने पुन्हा तीन दिवस उष्ण लाटेचा इशारा दिल्याने विदर्भवासींना आणखी चटके बसणार आहेत.

संपूर्ण विदर्भ सध्या "मे हिट'च्या तडाख्याने हैराण आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. सूर्य जसजसा डोक्‍यावर येतो, तसतशी उन्हाची तीव्रता वाढत जाते. उन्हाच्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव पूर्वविदर्भातील जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. चंद्रपूर येथे गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही विदर्भात सर्वाधिक म्हणजेच 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ब्रह्मपुरीतही पारा 46 अंशांवर होता. नागपूरकरही उन्हामुळे कमालीचे त्रस्त आहेत. या महिन्यात नागपूरचे कमाल तापमान दुसऱ्यांदा सर्वाधिक (45.9 अंश सेल्सिअस) नोंदले गेले. याआधी 15 मे रोजी पारा या मोसमातील उच्चांकीवर (46.2 अंश सेल्सिअस) गेला होता.

सूर्यदेवाचा प्रकोप विदर्भातील वर्धा (45.5 अंश सेल्सिअस), अकोला (44.4 अंश सेल्सिअस) आणि अमरावती (43.4 अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांमध्ये प्रकर्षाने जाणवला. प्रादेशिक हवामान विभागाने आज आणखी तीन दिवस उन्हाच्या लाटेचा इशारा दिल्याने सोमवारपर्यंत उन्हाचे चटके कायम राहण्याची शक्‍यता आहे.

विदर्भातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये
नागपूर 45.9
अकोला 44.4
अमरावती 43.5
बुलडाणा 40.8
ब्रह्मपुरी 46.0
चंद्रपूर 46.2
गोंदिया 43.7
वर्धा 45.5
वाशीम 43.0
यवतमाळ 43.0

Web Title: temperature increase in vidarbha