दहाही विशेष समित्यांवर सभापती बिनविरोध

दहाही विशेष समित्यांवर सभापती बिनविरोध

नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यातील तीन सभापती पूर्व नागपुरातील सदस्य आहेत. याशिवाय स्थायी समिती अध्यक्षपदीही पूर्व नागपुरातील प्रदीप पोहाणे आहेत. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अश्विन मुदगल यांनी विशेष समिती सभापतींच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, निगम सचिव हरीश दुबे उपस्थित होते. परिवहन समितीच्या सभापतीपदी बंटी कुकडे यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली. विधी व सामान्य प्रशासन विशेष समितीचे सभापती म्हणून धर्मपाल मेश्राम यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून मिनाक्षी तेलगोटे उपसभापतिपदी निवडल्या गेल्या. विजय झलके यांना जलप्रदाय विशेष समिती सभापती म्हणून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. समितीच्या उपसभापतीपदी भगवान मेंढे यांची निवड करण्यात आली आहे. हे तिन्ही सभापती पूर्व नागपुरातील आहेत. लोकसभा निवडणुकीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना सर्वाधिक 76 हजार मतांची आघाडी पूर्व नागपुरातून मिळाली होती. त्यामुळे समित्यांवर पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचा वरचष्मा दिसून येत आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांची वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापतीपदी तर नागेश सहारे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. स्थापत्य व प्रकल्प समितीच्या सभापतीपदी अभय गोटेकर तर उपसभापतीपदी किशोर वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. दिलीप दिवे यांनाही शिक्षण समिती सभापतीपदी कायम ठेवण्यात आले असून प्रमोद तभाने यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती म्हणून संदीप जाधव व उपसभापती म्हणून सुनील अग्रवाल यांना कायम ठेवण्यात आले आहे. गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या सभापतीपदी लक्ष्मी यादव तर उपसभापतीपदी उषा पॅलट, क्रीडा समितीचे सभापती म्हणून प्रमोद चिखले व उपसभापती म्हणून मनीषा कोठे यांची निवड करण्यात आली आहे. संगीता गिऱ्हे यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी तर दिव्या धुरडे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापतीपदी संजयकुमार कृष्णराव बालपांडे व उपसभापतीपदी निशांत गांधी यांची निवड करण्यात आली आहे. निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निगम सचिव हरीश दुबे यांनी तुळशीचे रोपटे देऊन सभापतींचे स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com