पूरपरिस्थितीत अंगणवाडी आहारासाठी निविदा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

नागपूर : राज्यात पूरपरिस्थिती असताना महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडींना नाश्‍ता व गरम आहाराच्या पुरवठ्यासाठी बचतगटांकडून निविदा मागविल्याने गावखेड्यातील बचतगटांना यात सहभागी होता आले नाही. अशा परिस्थितीत निविदा काढण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नागपूर : राज्यात पूरपरिस्थिती असताना महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडींना नाश्‍ता व गरम आहाराच्या पुरवठ्यासाठी बचतगटांकडून निविदा मागविल्याने गावखेड्यातील बचतगटांना यात सहभागी होता आले नाही. अशा परिस्थितीत निविदा काढण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

9 ऑगस्टला दिलेल्या पत्रानुसार, 19 ऑगस्टपासून प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ज्यावेळी पत्र काढण्यात आले, त्यावेळी राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सुरू होती. कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे या परिसरात पावसाने थैमान घातले. त्यामुळे हजारो कुटुंबाची वाताहत झाली. यामुळे अंगणवाडी आणि शाळा जवळपास बंद आहेत. अद्यापही बऱ्याच भागात परिस्थिती कायम असल्याने त्या ठिकाणी जनजीवन सामान्य होण्यास बराच वेळ लागणार आहे. मात्र, याचा विचार न करता महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडींना नाश्‍ता व गरम आहाराच्या पुरवठ्यासाठी बचतगटांकडून निविदा मागविल्यात. कुठल्याही उपक्रमाची जाहिरात सरकारकडून काढताना, त्या पेपरचा खप आणि दर्जा लक्षात घेण्यात येतो. मात्र, महिला व बालकल्याण विभागाने ज्या पेपरची माहितीच नाही अशा पेपरमध्ये या निविदांची जाहिरात दिल्याचे कळते. त्यामुळे निविदांच्या प्रक्रियेबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.
निविदा प्रक्रिया रद्द करा
राज्यातील बहुतांश भागात पूरपरिस्थिती असल्याने प्रक्रिया रद्द करण्याची मागणी भाजप महिला बचतगट संघटनेद्वारे राज्य सरकारला करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकांना कळू नये अशाच प्रकारे ही जाहिरात दिल्याचेही यातून स्पष्ट होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता आणि पूरग्रस्त भागातील प्रत्येक गावातील बचतगटांना न्याय मिळावा म्हणून नव्याने प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी संघटनेतर्फे अध्यक्ष नलिनी भगत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, आयुक्त इंद्रा मालो जैन, सचिव आय. ए. कुंदन यांना निवेदनातून केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tender for Anganwadi food in flood situation