एक लाख विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

भंडारा : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. परंतु, नियोजनाचा अभाव व इतर त्रुटींमुळे संपूर्ण पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नव्हती. परंतु, यावेळी मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके वितरणाचा योग जुळून येणार आहे. नोंदविल्या मागणीचा संपूर्ण 100 टक्के साठा प्राप्त झाला असून शाळेच्या प्रारंभीच नवी कोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत.

येत्या 26 जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानांतर्गत पाठ्यपुस्तके प्राप्त होणार आहेत. जिल्ह्यातील 1 लाख 10 हजार 687 विद्यार्थ्यांना 6 लाख 17 हजार 571 पुस्तकांची गरज आहे. मागणीनुसार सर्व पाठ्यपुस्तके बालभारतीतर्फे उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे यावेळी पाठ्यपुस्तके वेळेवर विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीतील सर्व शासकीय शाळा, अनुदानित खासगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची संख्या 13 हजार 168, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 13 हजार 212, चौथीची संख्या 13 हजार 207, पाचवीची संख्या 13 हजार 81 आहे. प्राथमिक गटात एकूण 65 हजार 680 विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी 3 लाख 2 हजार 280 पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली होती.
उच्चमाध्यमिक गटात सहावीचे 14 हजार 106, सातवीचे 14 हजार 996 व आठवीचे 15 हजार 905 असे एकूण 45 हजार सात विद्यार्थी आहेत. प्राथमिक व उच्चप्राथमिक अशा दोन्ही गटातील लाभार्थींची संख्या 1 लाख 10 हजार 687 इतकी आहे. त्यांच्यासाठी 6 लाख 17 हजार 571 पुस्तकांची मागणी करण्यात आली होती.
1 जूनपर्यंत सर्व पाठ्यपुस्तके बालभारती नागपूर येथून उचल करण्यात आली. ही पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर पोहोचती करण्यात आली. तालुकास्तरावरून शाळास्तरावर पाठ्यपुस्तक वितरणाचे काम सुरू आहे. दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तक योजना राबविली जाते. परंतु, नियोजन चुकल्यामुळे शाळा सुरू होऊनही वेळेवर पाठ्यपुस्तके उपलब्ध होत नाहीत. ही पुस्तके उशिरा, शाळा सुरू झाल्यावर दोन किंवा तीन आठवड्यांनी मिळतात. मात्र, यंदा पहिल्याच दिवशी राज्यातील विद्यार्थ्यांना पुस्तक मिळावे यासाठी कसून अंमलबजावणी करण्यात आली.

63 केंद्रांमार्फत वितरण
दरवर्षी बालभारतीकडून विलंबाने पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जात होता. परिणामी उशिरा प्राप्त झालेल्या पुस्तकांच्या एकूण किंमतीवर प्रतिआठवडा 05 टक्के याप्रमाणे शासनाकडून बालभारतीकडून दंड वसूल केला जात होता. पुस्तकांचा पुरवठा वेळेवर न केल्याने होणारी मानहानी तसेच आर्थिक भुर्दंडातून बचाव होण्यासाठी यावेळी योग्य नियोजन व वेळापत्रक करून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. 15 एप्रिलपर्यंत पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Textbooks to get one lakh students