बुद्धांच्या धम्मामुळे थायलंडची प्रगती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नागपूर ः दुसऱ्या महायुद्धासमयी थायलंड देशाची परिस्थिती बिकट होती. मात्र या देशाने भगवान बुद्ध यांचा विचार स्वीकारला. त्यांच्या आचारसंहितेचे या देशात पालन झाले. आज 95 टक्के जनता येथे बौद्ध असून बुद्धांच्या धम्मामुळे थायलंडची प्रगती झाली, असे प्रतिपादन भन्ते डॉ. परमाह अनेक यांनी केले.

नागपूर ः दुसऱ्या महायुद्धासमयी थायलंड देशाची परिस्थिती बिकट होती. मात्र या देशाने भगवान बुद्ध यांचा विचार स्वीकारला. त्यांच्या आचारसंहितेचे या देशात पालन झाले. आज 95 टक्के जनता येथे बौद्ध असून बुद्धांच्या धम्मामुळे थायलंडची प्रगती झाली, असे प्रतिपादन भन्ते डॉ. परमाह अनेक यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे 14 ऑक्‍टोबर 1956च्या धम्मक्रांतीचा 63 वा वर्धापनदिन दीक्षाभूमीवर साजरा करण्यात आला. यावेळी भन्ते डॉ. अनेक बोलत होते. अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. धम्मपीठावर जागतिक बुद्धिस्ट परिषदेचे अध्यक्ष डॉ. पालामोधम्मो पोर्नचाई पिनयोपांग, म्यानमारचे महाउपासक टेंग ग्यार थॅन हॅल, शिनीचिरो किशी, सेईगो ससाहारा, जागतिक शांतता परिषदेचे सल्लागार भदन्त कीर्ती न्यौलकॅगचंग, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थुल, कमलताई गवई, कॅप्टन नटकिट (थायलंड), नाना अबेना फ्रेम्फोमा धामा, स्मारक समितीचे कार्यवाह सदानंद फुलझेले, शोवा शाक्‍य (नेपाल), अंजली त्रिनेट, मिथिला चौधरी (बांगलादेश), साबूज बरुआ (बांगलादेश), अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्‍याम तागडे उपस्थित होते. भन्ते डॉ. अनेक म्हणाले, जगाच्या इतिहासात 14 ऑक्‍टोबर 1956 या दिवसाची नोंद झाली. जग विसरू शकणार नाही, अशी धम्मक्रांती नागपुरात झाली. या भूमीतून डॉ. आंबेडकर यांनी जगाला मानवतेचा संदेश दिला. बुद्धाचा धम्म विपरीत परिस्थितीतही मात करू शकतो. या धम्मात असलेली नैतिकता आणि नीतिमत्ता बाबासाहेबांनी अखेरपर्यंत जोपासली, यामुळे ते पुढे गेले. जगात बाबासाहेबांचे विचार वास्तविकतेला धरून आहेत. त्यांनी जन्माने नाही तर कर्माने माणूस मोठा होतो हे सिद्ध करून दाखवले, असे डॉ. अनेक म्हणाले.

अध्यक्षीय भाषणातून भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांनी जगात शांतीसाठी बुद्धाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. प्रास्ताविक विलास गजघाटे यांनी केले. संचालन स्मारक समितीचे सदस्य एन. आर. सुटे यांनी केले. परिचय प्रा. अर्चना मेश्राम यांनी करून दिला. आभार ऍड. आनंद फुलझेले यांनी मानले.

"बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले'
तथागतांचा बुद्ध धम्म भारतातील; परंतु काळाच्या ओघात ऱ्हास झाला, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 ला पुन्हा बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन भारतात केले. महान अशा बुद्धाच्या संस्कृतीमध्ये राहण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. बुद्ध आणि आंबेडकर यांचे जीवन आम्हाला जगण्यासाठी प्रेरणादायी आहे. बुद्धांच्या विचारानेच गाव, शहर आणि देश टिकून राहू शकते, असे म्यानमारचे महाउपासक टेंग ग्यार थॅन हॅल यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thailand's progress through the Buddha's Dhamma