ठाकरे सरकारचा सपाटा कायम,फडणवीस सरकारचा हा निर्णय देखील फिरवला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

आता राज्यातील जिल्हापरिषदांतर्गत शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या सुद्धा शासनाच्या "रडार'वर आल्या असून बदली प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक अभ्यासगट नियुक्त केला आहे. या अभ्यासगटाच्या माध्यमातून बदली धोरणाची समीक्षा केली जाणार आहे.

अमरावती : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून पूर्वीच्या फडणवीस सरकारमध्ये घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांची समीक्षा केली जात आहे. त्या अनुषंगाने आता राज्यातील जिल्हापरिषदांतर्गत शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या सुद्धा शासनाच्या "रडार'वर आल्या असून बदली प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक अभ्यासगट नियुक्त केला आहे. या अभ्यासगटाच्या माध्यमातून बदली धोरणाची समीक्षा केली जाणार आहे.

सविस्तर वाचा - डॉन आंबेकरचे पैसे प्रॉपर्टीत गुंतवणार कोण? वाचा काय झाले

पुणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे या अभ्यासगटाचे अध्यक्ष राहणार आहेत. तसेच रायगड जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे सदस्य सचिव आहेत. याशिवाय या अभ्यासगटामध्ये चंद्रपूरचे सीईओ राहुल कर्डिले, नंदुरबारचे सीईओ विनय गौडा तसेच उस्मानाबाद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 24 एप्रिल 2017 च्या शासननिर्णयानुसार जिल्हापरिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत. ऑनलाइन बदल्यांमध्ये सुद्धा काही त्रुट्या असू शकतात, ही शक्‍यता गृहीत धरून सुधारित धोरण ठरविण्यासाठी या अभ्यासगटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या संदर्भात अभ्यासगटाचे सदस्य शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी सुद्धा चर्चा करणार आहेत. त्यानुसार प्राप्त अहवालानंतर ऑनलाइन बदल्याचे धोरण निश्‍चित होणार असल्याची माहिती आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thakare government chenge Phadanvis governments one more dicision