यवतमाळच्या आंदोलनाचे विदर्भात पडसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidarbha

यवतमाळच्या आंदोलनाचे विदर्भात पडसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : येथील वैद्यकीय महाविद्यालयातील ‘एमबीएसएस’च्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा बुधवारी रात्री खून करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनाचे पडसाद विदर्भात उमटले. शनिवारपासून (ता. १३) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थी संपात सहभागी होणार आहेत, अशी माहिती शुक्रवारी (ता. १२) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

वैद्यकीय महाविद्यालय परिसरात सुरक्षांचा अभाव असल्याने डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पथदिवे, सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, वाढलेले गवत, झुडेझुडपांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतही सुरक्षेचा अभाव आहे. अशोक पाल याला न्याय मिळावा व भविष्यात अशी घटना कुठेही घडू नये, यासाठी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, अकोला येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी संपात सहभागी होणार आहेत. न्याय न मिळाल्यास हे आंदोलन राज्यात पसरेल, असा इशाराही देण्यात आला.

हेही वाचा: राज्यात 5 दिवस मेघ गर्जनेसह पाऊस: 'या' तिन जिल्ह्यांना यलो अलर्ट

आंदोलनाला मार्ड, अस्मी, आयएमए, मॅग्मो, महाराष्ट्र स्टेट टिचर्स असोसिएशन, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी, नर्सेस संघटनांचा पाठिंबा आहे. पत्रकार परिषदेला मार्डचे अध्यक्ष सागर डोले, अस्मीचे अध्यक्ष विशाल मस्के, माजी विद्यार्थी डॉ. सचिन बेले, महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेचे सोलापूर येथील डॉ. स्वप्निल तांगडे, डॉ. प्रणव जगदणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: राज्यात लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राबवणार ?

पाच लाखांची मदत

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांना जबर धक्का बसला आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. विविध राज्यांत प्रशासकीय सेवेत अधिकारी असलेल्या व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी अशोक पाल यांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत जाहीर केली, अशी माहिती डॉ. सचिन बेले यांनी दिली.

‘आयएमए’चे आज कामबंद

प्रशासनाकडून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी दिवसभरात कुठल्याही प्रकारचा संपर्क मार्डच्या डॉक्टरांशी झाला नाही. मार्डचे विदर्भातील डॉक्टर संपावर जाणार आहेत. या संपाला पाठिंबा देत ‘आयएमएने’ही शनिवारी (ता.13) सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत कामबंदचा निर्णय घेतला. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

loading image
go to top