अरे देवा...! येथे मरणानंतरही होतात मरण यातना.. पण काय आहे कारण? जाणून घ्या...

अरविंद चुनारकर
Sunday, 2 August 2020

जिल्ह्यातील ब्रह्मपुरीची शिक्षण नगरी अशी ओळख आहे. गेल्या काही वर्षांत या शहराची व्याप्ती वाढली आहे. अंत्यसंस्कार करण्याचे ठिकाण आता शहरापासून बरेच लांब आहे. त्यासाठी स्वर्गरथ आवश्‍यक आहे.

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर): मनुष्य मृत्यूनंतर अनंतात विलीन होतो असे म्हणतात. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र चंद्रपूर जिल्हयातील ब्रह्मपुरी येथे मरणही सोपे राहिले नाही आहे. व्यक्तीच्या मरणानंतरही अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांचे आणि मृतदेहाचे हाल होत आहेत.      

जिल्ह्यातील ब्रह्मपुरीची शिक्षण नगरी अशी ओळख आहे. गेल्या काही वर्षांत या शहराची व्याप्ती वाढली आहे. अंत्यसंस्कार करण्याचे ठिकाण आता शहरापासून बरेच लांब आहे. त्यासाठी स्वर्गरथ आवश्‍यक आहे.

हेही वाचा - हे काय, तुकाराम मुंढे यांच्या घरावर धडकले नागरिक, काय असेल कारण...

स्वर्गरथाची दुरुस्तीच नाही

ब्रह्मपुरीकरांची मागणी लक्षात घेता एका आमदाराने स्वर्गरथ बहाल केला होता. काही दिवस त्याचा बऱ्यापैकी उपयोग झाला. कालांतराने त्यात बिघाड आला. त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. 

अंत्यसंस्काराची गरज लक्षात ब्रह्मपुरीत दोन आमदारांनी काही वर्षांआधी दोन स्वर्गरथ दिले. यातील एक स्वर्गरथ मालवाहक, तर दुसरे अडगळीत पडून आहे. मागील दोन वर्षांपासून शहरात एकही स्वर्गरथ नाही. स्वर्गरथासाठी नागभीडवरच विसंबून राहावे लागत आहे.

नागभीडवर अवलंबून 

अंत्यसंस्कारासाठी मृताच्या कुटुंबीयांना वडसा, नागभीड येथून स्वर्गरथ बोलवावे लागतात. काही प्रभागासाठी अंतिम संस्काराचे ठिकाण तीन ते चार किमी इतके लांब आहे. अशावेळी स्वर्गरथाची गरज जास्त भासते. मात्र, तेही मिळत नसल्याने शोकाकुल कुटुंबाची चांगलीच तारांबळ उडते.

जाणून घ्या - विश्वास बसेल का? आधीच्या काळात पुरुषही घालायचे जोडवे, कारण वाचून बसेल धक्का...

समस्या दूर करू 
कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व कामे ठप्प झाली आहेत. स्वर्गरथ उपलब्ध करून देण्यासंदर्भात आपण भूमिका घेतली आहे. ब्रह्मपुरीकरांची ही समस्या दूर करू, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल.
रिता दीपक उराडे, 
नगराध्यक्ष, ब्रह्मपुरी.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there is no van for funerals in brahmpuri read full story