कोरोनाशी लढण्यासाठी त्यांनी केली ही नियमावली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

गडचिरोली जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. त्यामुळे कोरोनाला बाहेरून गावात शिरू देणार नाही, कोरोनाचा संसर्ग गावात पसरू देणार नाही, यासाठी आवश्‍यक सवयी लोकांना लावून त्याचे पालन करणे आणि गावातील रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार, असा संकल्प गावांनी करण्यासाठी जनजागृती केली जात आहे.

गडचिरोली  : कोरोना संसर्गापासून गावांचा बचाव करण्यासाठी सर्च या आरोग्यसेवी संस्थेने 15 कलमी कार्यक्रम तयार केला आहे. गावाची सुरक्षा गावाच्याच हाती या संकल्पनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांसाठी हा कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. त्यामुळे कोरोनाला बाहेरून गावात शिरू देणार नाही, कोरोनाचा संसर्ग गावात पसरू देणार नाही, यासाठी आवश्‍यक सवयी लोकांना लावून त्याचे पालन करणे आणि गावातील रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार, असा संकल्प गावांनी करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. यासाठी कोरोनामुक्ती गाव समिती व युवा पथक गावांमध्ये तयार केले जात आहे. या 15 कलमी कार्यक्रमांमध्ये गावातून बाहेर जाणे व येणे बंद, बाहेरून गावात परत आलेल्यांना 14 दिवस वेगळ्या जागी ठेवणे, गावात गर्दी होईल असे बाजार, सण, समारंभ रद्द करणे, एखाद्याचा मृत्यू झाल्यास अतिशय कमी लोकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून विधी पूर्ण करणे बंधनकारक आहे. घराबाहेर पडताना नाकातोंडावर मास्क अथवा रुमाल बांधणे, एकमेकांपासून किमान सहा फुट अंतर राखणे आणि प्रत्येकाने दररोज किमान सहा वेळा साबणाने हात स्वच्छ धुणे आवश्‍यक आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या थुंकीतून हा आजार पसरू शकतो. त्यामुळे गावातील पानठेले पूर्णतः बंद राहतील तसेच कुठेही खर्राविक्री केली जाणार नाही. दारू पिताना लोकांची गर्दी होते. त्यामुळे गावातील दारूविक्री व निर्मिती पूर्णतः बंद राहील. त्याचबरोबर बाहेरूनही गावात दारू येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.

सविस्तर वाचा - कोरोना पाठोपाठ विदर्भात या आजारानेही काढले डोके वर; मेडिकलमध्ये एकाचा बळी
ताप, खोकला व दम लागणे ही कोरोना आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे असलेल्यांचा शोध घेत तपासणीसाठी सर्चचे आरोग्यदूत किंवा आशांकडे पाठविले जाईल. त्यांना आवश्‍यक तो उपचार देत घरातच त्यांचे विलगीकरण केले जाईल. एखाद्याला गंभीर आजार झाल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल केले जाईल. त्याचबरोबर गावातील आजार व मृत्यूची नोंदही केली जाणार आहे. या 15 कलमी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावात कोरोना समिती आणि युवा पथक तयार केले जात असून सर्वांचे आरोग्यशिक्षण सर्चद्वारे केले जाणार आहे. जिल्ह्यासोबत संपर्क तुटल्याने या काळात अनेक गावांना अन्नधान्याचा तुटवडा जाणवू शकतो. गावांना मास्कची आवश्‍यकता असून बाहेरून आलेल्यांना क्‍वारंटाईन करण्यासाठी प्रत्येक गावात जागेची तजवीज आवश्‍यक आहे. यासाठीचे नियोजन शासनाला करावे लागणार आहे. गावात कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची खबरदारी घेऊन आवश्‍यक उपाययोजना करण्याची जबाबदारी प्रत्येक गावाची आहे. ही जबाबदारी गावांनी योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी हा 15 कलमी कार्यक्रम सर्चद्वारे आखण्यात आला आहे. गावागावात याचा प्रसार सुरू आहे. रोज नवीन पाच गावे या अभियानात सामील होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They made advisory to fight corona