
कुलदीपसिंग अकालीसिंग बावरी (२१ वर्ष, रा. तळेगाव श्या.पं.) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वडिलांनी दोन महिन्यांपूर्वी घेतलेली दुचाकी घेऊन तो गुरुवारी (ता.१७) आर्वी येथे आला. त्याने शहरात फेरफटका मारून बंद घरांचा कानोसा घेतला.
आर्वी (जि. वर्धा) : दुपारी रेकी करून बंद घराचा कानोसा घेतला आणि मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी करून एक लाख ३२ हजार ५२० रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज व तीन हजार रुपये लंपास केले. बाजूच्या घरी चोरी होत असल्याचे लक्षात येताच शेजाऱ्याने चोरांना पकडण्याकरिता सापळा लावला; मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन चोर पसार झाला. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी या चोरट्यांना अटक केली. शुक्रवारी (ता.१८) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
कुलदीपसिंग अकालीसिंग बावरी (२१ वर्ष, रा. तळेगाव श्या.पं.) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वडिलांनी दोन महिन्यांपूर्वी घेतलेली दुचाकी घेऊन तो गुरुवारी (ता.१७) आर्वी येथे आला. त्याने शहरात फेरफटका मारून बंद घरांचा कानोसा घेतला. चेअरी ले-आउटमधील कुलभूषण ठाकरे व संभाजीनगर येथील प्रवीण भुतडा यांचे घर फोडण्याचा निर्णय घेत परत तळेगाव (शा.पं.) येथे गेला.
रात्री बारा वाजताच्या सुमारास आर्वी येथे येत ठाकरे यांच्या बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील तीन हजार रुपयांवर त्याने हात साफ केला. नंतर त्याने मोर्चा संभाजीनगरमधील प्रवीण भुतडा यांच्या घराकडे वळविला. घराच्या दाराचे कुलूप पेचकसने तोडून घरात प्रवेश केला आणि १ लाख ३२ हजार ५२० रुपयांच्या सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला.
शेजारच्या घरात चोरी होत असतानाच शेजारी प्रवीण पावडे घराबाहेर आले. त्यांना शेजारच्या घरातील लाईट सुरू दिसला. शिवाय घरातून आवाजही आला. चोर घरात शिरल्याची शंका आल्याने त्यांनी शेजारी राहत असलेल्या विजय मारोडकर, रावसाहेब धांदे, रूपेश सावध, आदींना याची माहिती दिली. चोरपावलांनी जाऊन घराला घेराव घातला. मात्र, चोरट्याने पलायन केले.
अशात त्याची दुचाकी तेथेच राहिली. ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाची यंत्रणा कामी लागली आणि अवघ्या काही तासातच जमादार रणजित जाधव, भगवान बावणे, भूषण निगोट, मनोज भांबले, राजू राऊत, प्रदीप दाताळकर, चंदू वाढवे, अनिल वैद्य, अतुल भोयर, सचिन नंदागवळी यांनी चोरट्याला अटक केली.
संपादन ः राजेंद्र मारोटकर