चोरट्यांनी अख्खे एटीएम पळविले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

काटोल (जि.नागपूर) : संचेती ले-आउटमधील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अख्खे एटीएम चोरट्यांनी रोख रकमेसह पळविल्याने शहरात खळबळ उडाली.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत रात्रीची ग्रस्त असताना चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.

काटोल (जि.नागपूर) : संचेती ले-आउटमधील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अख्खे एटीएम चोरट्यांनी रोख रकमेसह पळविल्याने शहरात खळबळ उडाली.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत रात्रीची ग्रस्त असताना चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
मुख्य मार्गावरील संचेती ले-आउट अनसूया पुरमकडे जाणाऱ्या रस्त्यात असलेल्या वीज कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयाच्या इमारतीतील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमध्ये ही घटना घडली. एटीएम बसस्थानकापासून नागपूरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर पाचशे मीटरवर आहे. दोन दिवस सुट्या आल्याने एटीएममध्ये रोकड अधिक जमा होती. त्यामुळे चोरट्यांच्या हाती शिल्लक 16 लाखांची रक्कम लागल्याची माहिती आहे. एटीएम मशीन, सीसीटीव्ही कॅमेरे व सीडीआरसहित सर्व सामग्री चोरट्यांनी लंपास केली. बॅंकेच्या माहितीनुसार, या एटीएममध्ये 11 ऑक्‍टोबरला 23 लाख टाकण्यात आले. त्यापैकी 13 ऑक्‍टोबरप्रर्यंत एटीममध्ये 15 लाख 99 हजार 700 रुपये व एटीएम (किंमत 1.50 लाख रुपये) असे एकूण 17 लाख 49 हजार 700 रुपयांची नोंद आहे.ही घटना शनिवारच्या मध्यरात्री घडली असावी, अशी शक्‍यता वर्तविण्यात येते. चोरी करताना चोरांनी पोलिसांना कुठलाही पुरावा सापडू नये, याची खबरदारी घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव, पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर, सहायक पोलिस निरीक्षक राहुल बोंद्रे, पोलिस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फिंगर प्रिंट्‌स तज्ज्ञांना पाचारण केले होते. चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही धागेदोरे मिळतात का, याची चौकशी सुरू केली. एटीएम केंद्रातील सीसीटीव्हीचे कनेक्‍शन बॅंकेसोबत जोडलेले असते. परंतु, चोर एवढे शातीर निघाले की, संपूर्ण सीसीटीव्हीचे कनेक्‍शन व एटीएम घेऊनच ते पसार झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काटोल पोलिसांनी तपास यंत्रणा जलदगतीने फिरविण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. काटोल पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thieves fled the entire ATM