शहरीकरणाला विकासाची संधी समजा : मुख्यमंत्री फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

अमरावती : शहरे 65 टक्के जीडीपी तयार करतात. शहरे रोजगार तयार करणारी आहेत. त्यामुळे शहरांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. शहरीकरणाची गती वाढली याचा अर्थ विकासाची संधी मिळाली आहे असे समजा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर प्रचार सभेत केले. 
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्थानिक नेहरू मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर संजय नरवणे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार जगदीश गुप्ता, अभिजित अडसूळ यांच्यासह सेना-भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंधरा वर्षे विरुद्ध युतीचे पाच वर्ष यावर चर्चा करण्याचे आव्हान देत टीका केली. ते म्हणाले, आम्ही सत्तेवर आलो तेव्हा राज्यातील एकही शहर हागणदारीमुक्त नव्हते. आता पन्नासवर झाली आहेत. शहरांच्या विकासावर भर देत पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापनाची कामे मार्गी लावली. अमरावती शहराचा उल्लेख करीत या शहराच्या विकासासाठी हजार कोटींवर रुपये निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. 
केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उज्ज्वला गॅस, रस्तेविकास, घरकुल योजनांचा उल्लेखही त्यांनी भाषणातून केला. ते म्हणाले, 7 लाख ग्रामीण व 5 लाख शहरी भागात घरकुलाचे काम सुरू असून 2021 पर्यंत आणखी 10 लाख घरकुल देणार आहोत. शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प आहे. शिक्षण व गुंतवणुकीच्या क्षेत्रात राज्य अग्रक्रमावर आले आहे. गेल्या पाच वर्षांत 60 लाख रोजगार दिले. आगामी पाच वर्षांत एक कोटी रोजगार देण्यात येतील. 
महिला बचतगटांना एक लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्यात येणार आहे. आतापर्यंत 40 लाख कुटुंबे जोडली गेली आहेत. पुढील पाच वर्षांत एक कोटी कुटुंबे जोडण्यात येणार आहेत. उद्योगांसाठी विदर्भात विजेचे दर तीन रुपयांनी कमी केल्याने गुंतवणूक वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Think of urbanization as an opportunity for development: CM Fadnavis