आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत शनिवारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नागपूर - आरटीई प्रवेशाच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीअंतर्गत आतापर्यंत पाच हजार 129 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. दुसऱ्या फेरीअंतर्गत प्रवेशाची विहीत मुदत संपली आहे. आता तक्रार निवारणासाठी पालकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रार निवारणानंतर शनिवारी तिसऱ्या फेरीसाठी सोडत जाहीर केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे. 

नागपूर - आरटीई प्रवेशाच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीअंतर्गत आतापर्यंत पाच हजार 129 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. दुसऱ्या फेरीअंतर्गत प्रवेशाची विहीत मुदत संपली आहे. आता तक्रार निवारणासाठी पालकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रार निवारणानंतर शनिवारी तिसऱ्या फेरीसाठी सोडत जाहीर केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे. 

प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थी व पालकांचे लक्ष तिसऱ्या फेरीकडे लागले आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड होऊनही मुदतीत प्रवेश घेतला नाही, असे विद्यार्थी पुढील फेऱ्यांसाठी अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे सोडतीद्वारे निवड झाल्यानंतर पालकांनी आपल्या पाल्याचा संबंधित शाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाल्यांसाठी नर्सरी व पहिलीसाठी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या विद्यार्थ्यांना आरटीई कायद्यातील तरतुदीनुसार मोफत प्रवेश दिला जातो. यंदाच्या वर्षी आरटीईसाठी राज्यभरातून दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आले. त्या तुलनेत प्रवेशासाठी एक लाख 26 हजार जागा उपलब्ध आहेत. त्यात प्रवेशाची पहिली व दुसरी फेरी पार पडली असून, 70 हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर 49 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातून 662 शाळांसाठी सहा हजार 690 जागांसाठी 7 हजार 805 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यातील पाच हजार 129 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे. उर्वरित एक हजार 861 जागांवर अद्याप प्रवेश व्हायचे आहे. त्यासाठी तिसरी फेरी घेण्यात येणार आहे. 

तांत्रिक समस्या सुटेना 
आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान करण्यात आलेल्या गुगल मॅपिंगमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे बऱ्याच पालकांना याचा फटका बसला आहे. यासंदर्भात शासनाकडून निश्‍चित धोरण नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. यावर उपसंचालकांनी आरटीईच्या नियमानुसार कारवाईचे आदेश दिले. मात्र, अद्यापही तांत्रिक समस्या सुटत नसल्याने शेकडो प्रवेश चुकीच्या पद्धतीने झाल्याचे दिसते. केवळ प्रवेश घोषित करण्याचे काम विभाग करीत असून त्यानंतरचा पाठपुरावा करण्यात विभाग अयशस्वी होत असल्याने "पुढे पाठ मागे सपाट' अशीच परिस्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: third draw on RTE admission Saturday