हजारो लिटर पाणी व्यर्थ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नागपूर : चार दिवसांपासून जलवाहिनीला गळती लागली असून, हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. याबाबत तक्रार करूनही दखल न घेतल्याने मनपा प्रशासनानेच पाणीबचतीला हरताळ फासल्याचे स्पष्ट झाले. नगरसेविका आभा पांडे यांनी सोमवारी संतप्त नागरिकांसह महापालिकेवर धडक दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्परता दाखविली.

शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. जलप्रदाय समिती सभापती यांनी पाणी बचतीवर भर देण्यासाठी आवाहन केले आहे. मात्र, महापालिका व ओसीडब्ल्यूचे अधिकारीच सत्ताधाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी टाकत असल्याचे बस्तरवारीत दिसून आले. बस्तरवारी परिसरातील जलवाहिनीला गळती लागली असून, चार दिवसांपासून पाणी वाहत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरसेविका आभा पांडे यांच्याकडे तक्रार केली. पांडे यांनी ओसीडब्ल्यू तसेच झोन अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, चार दिवस लोटूनही यावर कुठलेही पाऊल न उचलल्याने आभा पांडे यांनी नागरिकांसह सोमवारी महापालिकेत धडक दिली. प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांना भेटून अधिकाऱ्यांच्या उदासीनतेकडे लक्ष वेधले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी धावपळ केली. चार दिवसांपासून अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचेही त्यांनी ठाकरे यांना सांगितले. अधिकाऱ्यांची बेजबाबदारी सहन केली जाणार नाही, असा इशाराही पांडे यांनी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of liters water is in vain