बापरे! पुसद शहरातील या तीन बँका अखेर का झाल्या बंद

दिनकर गुल्हाने
Saturday, 19 September 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुसद शहरातील जनता त्रस्त झाली आहे. अशातच भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र बँक व युनियन बँकांमधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने या तीनही बँका गेल्या आठवड्यापासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बँकांचे व्यवहारही ठप्प झाले आहेत.

पुसद (जि. यवतमाळ) : पुसद शहरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील भारतीय स्टेट बॅंक, महाराष्ट्र बॅंक व युनियन बॅंकेतील कर्मचारी कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाल्याने या तीनही बॅंक गेल्या आठवड्यापासून बंदच आहेत. त्यामुळे बॅंकेचे व्यवहार ठप्प पडले असून ग्राहकांची कुचंबणा होत आहे.

कोरोनामुळे १५ दिवस बॅंका बंद ठेवण्याचे आदेश कुणाचे आहेत, असा प्रश्न येथील व्यावसायिक धनंजय सोनी यांनी रिझर्व्‍ह बॅंकेला विचारला असून, बॅंकेचे काम पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जाणून घ्या : कुठे सॅनिटाईझर गायब तर कुठे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; ATM ठरताहेत कोरोना संसर्गाचे कारण

बॅंकेचे व्यवहार ठप्प, ग्राहकांना त्रास

सध्याचे दिवस हे सणासुदीचे आहेत. लॉकडाउननंतर व्यापारी आधीच आर्थिक अडचणीत आलेले आहेत. कठीण परिस्थिती व्यवसाय सुरू असताना बॅंकेचे व्यवहार ठप्प झाल्याने नवीनच प्रश्न व्यापाऱ्यांच्या पुढे उभे ठाकलेले आहेत. बॅंकेचे व्यवहार बंद असल्याने पैसे ट्रान्सफर करणे, पैसे काढणे, शेतकरी व मजूर वर्गाचे छोटे-मोठे व्यवहार थांबले आहेत.

बॅंक बंद ठेवण्याचा आदेश कुणाचा?

बॅंक बंद असल्याचा परिणाम पुसदच्या बाजारपेठेवर झालेला आहे. बॅंकेमध्ये बरेचसे कर्मचारी असताना पॉझिटिव्ह कर्मचारी सोडून इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ शकते. बॅंक बंद ठेवल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. अशा परिस्थितीत पूर्णतः दहा ते १५ दिवस बॅंक बंद ठेवण्याचा आदेश कुणी दिलेला आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

जाणून घ्या :  अभिनंदनीय! शाळा बंद पण अभ्यास सुरू, नदी, नाले तुडवत शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी

रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नर यांना पत्र

बॅंक बंद करण्याच्यासंदर्भात येथील व्यावसायिक धनंजय सोनी यांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कस्टमर केअर सेंटरला संपर्क साधला असता, बॅंक बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. बॅंकेतील कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह निघाल्यानंतर केवळ ४८ तास बॅंक बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. पर्यायी व्यवस्था बॅंकेने करावी असे कस्टमर केअर सेंटरवरून सांगण्यात आले. त्यामुळे दोन आठवड्यापर्यंत बॅंक बंद ठेवण्याचा आदेश कोणाचा आहे, असा प्रश्न त्यांनी केला. यासंदर्भात त्यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नर यांना मेलवरून पत्र पाठवीत बॅंका लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three banks closed due to corona positive employees in pusad