नक्षलवाद्यांना पैसे पुरविणाऱ्या तीन कंत्राटदारांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

75 लाखांची रोकड जप्त; आलापल्लीत पोलिसांची कारवाई
अहेरी (गडचिरोली) - नक्षलवाद्यांना पैसे पोचविणाऱ्या तीन तेंदूपत्ता कंत्राटदारांना पोलिसांनी आज पहाटे आलापल्लीत अटक केली.

75 लाखांची रोकड जप्त; आलापल्लीत पोलिसांची कारवाई
अहेरी (गडचिरोली) - नक्षलवाद्यांना पैसे पोचविणाऱ्या तीन तेंदूपत्ता कंत्राटदारांना पोलिसांनी आज पहाटे आलापल्लीत अटक केली.

या कंत्राटदारांकडून 75 लाखांची रोकड व मोटारही जप्त करण्यात आली. या वाहनात नक्षलवाद्यांशी संबंधित पत्रके आढळून आली.
नागराज समय्या पुट्टा (37), पहाडिया तुळशीराम तांपला (35), रवी मलय्या तनकम (45) अशी अटक करण्यात आलेल्या कंत्राटदारांची नावे असून, ते तेलंगण राज्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. "प्राणहिता' या विशेष अभियान पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मीलन कुरकुटे व त्यांचे पथक नक्षलविरोधी अभियान राबवून परत येत असताना पहाटे 2 वाजताच्या सुमारास त्यांना आलापल्ली येथे विनानंबरची मोटार संशयास्पद स्थितीत आढळून आली. पोलिसांनी चौकशी केली असता गाडीत असलेले तिघेही गोंधळून गेले. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक कुरकुटे यांनी अहेरी पोलिस ठाण्यातून एक पथक मागविले. गाडीची तपासणी केली असता त्यातून नक्षल पत्रके व 75 लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. त्यामुळे तिघांनाही अटक करण्यात आली. अधिक चौकशीअंती ते तेंदूपत्ता ठेकेदार असल्याची माहिती मिळाली. जप्त करण्यात आलेला पैसा नक्षल्यांना देण्यासाठी नेला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

आरोपींविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर चामोर्शी न्यायालयात हजर केले असता त्यांना रविवार (ता. 28) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तेंदू संकलन तसेच बोदभरतीच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तेंदूपत्ता तोडण्याच्या हंगामात कंत्राटदारांकडून नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणात रोकड पुरविली जाते. याशिवाय शस्त्रपुरवठाही केला जात असल्याने तेंदूपत्ता हंगामात पोलिसांची करडी नजर असते.

Web Title: three contractor arrested