विदर्भात तीन शेतकऱ्यांनी संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नागपूर : अवकाळी पाऊस, कर्ज आणि नापिकीली कंटाळून विदर्भातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (ता. 8) उघडकीस आले. यात अमरावती, यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समावेश आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
गडचिरोली : अवकाळी पावसामुळे झालेली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आज, शुक्रवारी सकाळी चामोर्शी तालुक्‍यातील खंडाळा येथील गुणाजी वासुदेव सातपुते (वय 40) या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
गुणाजी सातपुते यांनी यंदा आपल्या शेतात धान व कपाशीची लागवड केली होती. परंतु, आधीची अतिवृष्टी व अलीकडेच आलेला अवकाळी पाऊस यामुळे दोन्ही पिकांची नासाडी झाली. त्यांनी सावली येथील आयडीबीआय बॅंकेच्या शाखेतून दीड लाख रुपयाचे पीककर्ज घेतले होते. परंतु, हातचे पीक गेल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. अखेर त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तक्रारीनंतर चामोर्शी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे तपास करीत आहेत.

शेतकऱ्याने घेतला गळफास
बेनोडा शहीद (जि. अमरावती) : एका युवा शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वरुड तालुक्‍यातील करजगाव गांधीघर येथे गुरुवारी (ता. 7) सायंकाळच्या सुमारास घडली. सुरेश विनोदराव बहुरूपी (वय 27) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सुरेश बहुरूपी यांच्याजवळ दोन एकर शेती होती. या शेतीमध्ये त्यांना सतत नापिकी होत होती. या वर्षीसुद्धा सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते चिंताक्रांत झाले होते. त्यामुळे त्यांनी गुरुवारी (ता. 7) सायंकाळी सहाच्या सुमारास निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात आई व विवाहित बहीण असा आप्तपरिवार आहे. बेनोडा शहीद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

एरंडगावच्या शेतकऱ्याने संपविले जीवन
घाटंजी (जि. यवतमाळ) : विदर्भात शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. अवकाळी पावसामुळे पीक वाया गेल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी आपले जीवन संपवीत आहेत. घाटंजी तालुक्‍यातील पारवा पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या एरंडगाव येथील शेतकरी रमेश विश्वनाथ ठाकरे (वय 39) यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) सकाळच्या सुमारास घडली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्तपरिवार आहे. दरम्यान, या घटनेने एरंडगावसह परिसरातील गावांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three farmers ended their lives in Vidarbha