तीनशे विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्‍न सुटेल  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नागपूर - सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहांचा प्रश्‍न अखेर निकाली लागला. येथील दोन वसतिगृह उभारण्यात येणार असून, यासाठी राज्य शासनाने ६० कोटी ८९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. उर्वरित तीन इमारतींच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळण्याचे संकेत आहेत.

आयुर्वेद महाविद्यालयात दरवर्षी ‘बीएएमएस’ अभ्यासक्रमात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यात ८० टक्के मुली असतात. महाविद्यालय परिसरात पदवी शिक्षण घेणाऱ्या ४०० विद्यार्थ्यांचा राबता असताना केवळ १०० विद्यार्थ्यांची सोय वसतिगृहात आहे. उर्वरित ३०० विद्यार्थ्यांना भाड्याने किंवा नातेवाइकांकडे राहावे लागते. प्रशासनाकडून वसतिगृहाअभावी विद्यार्थ्यांना  होणाऱ्या त्रासासंदर्भातील वास्तव शासनाला कळविले. वारंवार प्रस्ताव सादर केले. 

तब्बल दोन  वर्षे पाठपुरावा केल्यानंतर शासनाने मुलींचे वसतिगृह बांधकामासाठी ३५ कोटी ४० लाख  रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून महाविद्यालयात ८ मजली विद्यार्थिनींचे वसतिगृह बांधण्यात येईल. याशिवाय पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीही एक वसतिगृह बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी २५ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. असे दोन वसतिगृह मिळून एकूण ६० कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

महाविद्यालयात अडीचशे पदव्युत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तयार होणाऱ्या नवीन वसतिगृहामध्ये पदवीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करून घेण्यात येईल. वसतिगृहाच्या एका खोलीत पदवीचे दोन विद्यार्थी राहतील, तर पदव्युत्तरचा एक विद्यार्थी एका खोलीमध्ये राहील. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त येईल. 
- डॉ. गणेश मुक्कावार, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर.

Web Title: Three hundred students will leave the question of accommodation