नक्षलवाद्यांनी केली तीन ग्रामस्थांची हत्या

Naxalite
Naxalite

गडचिरोली - पोलिस चकमकीत 40 नक्षलवादी ठार होण्यास कारणीभूत असल्याच्या संशयावरून सशस्त्र नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्‍यातील कसनासूर येथील तीन नागरिकांची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे दहशत पसरली असून, धास्तावलेल्या कसनासूर गावातील दीडशे नागरिकांनी पोलिस ठाण्याचा आश्रय घेतला आहे. मालु दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी व लालसू मासा कुडयेटी अशी मृतांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह भामरागड-आलापल्ली मार्गावरील कोसफुंडी फाट्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.

22 एप्रिल 2018 रोजी भामरागड तालुक्‍यातील कसनासूर-बोरिया जंगल, तसेच राजाराम खांदला-नैनेर परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत 40 नक्षलवादी ठार झाले होते. त्यात डीव्हीसी सिनू, त्याची पत्नी कमांडर शांता व पेरमिली दलम कमांडर तथा डीव्हीसी साईनाथ या प्रमुख व जहाल नक्षलवाद्यांचा समावेश होता. या हत्येस मालु दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी व लालसू मासा कुडयेटी कारणीभूत असून, त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यामुळेच नक्षलवाद्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे तिघांची हत्या केल्याचा उल्लेख नक्षलवाद्यांनी बॅनरवर केला आहे.

सुमारे शंभर सशस्त्र नक्षलवादी शुक्रवारी (ता.18) कसनासूर गावात गेले होते. त्यांनी ग्रामस्थांना एकत्र बोलावून 40 नक्षलवाद्यांचा बदला घेण्याची धमकी दिली. काहींच्या धान्याचीही नासधूस केली. सोमवारी (ता.21) गावातील काही वृद्ध वगळता दीडशे गावकऱ्यांनी आपले गाव सोडून ताडगाव पोलिस मदत केंद्र गाठले. सध्या सर्व जण तेथेच आश्रयाला आहेत. विशेष म्हणजे, नक्षलवादी 6 जणांना घेऊन गेले होते. त्यातील तिघांची त्यांनी निर्घृण हत्या केली.

आतापर्यंत 516 बळी
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाल्यापासून आजपर्यंत नक्षलवाद्यांनी 516 नागरिकांची हत्या केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com