बोलेरो झाडावर आदळून तीन भाविक ठार, अठरा जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मुळावा (जि. यवतमाळ) : तेलंगणा राज्यातील पटनापूर येथे श्रीफुलाजीबाबा यांच्या दर्शनाकरिता जात असलेल्या बोलेरो गाडीला भीषण अपघात होऊन दोन महिला व एका पुरुषासह तीन भाविक ठार झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (ता.26) पहाटे तीन वाजता माहूर तालुक्‍यातील गोंडवडसा गावाजवळ घडला. मृत व जखमी भाविक हे यवतमाळ जिल्ह्यातील धनज (ता. उमरखेड) येथील आहेत

माहूर येथून वीस किमी अंतरावर असलेल्या गोंडवडसा गावाजवळ पहाटे तीन वाजता बोलेरो पिकअप वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. अपघातग्रस्त वाहनात चालकासह एकवीस भाविक होते. त्यांच्यापैकी रुखमाबाई केशव वंजारे (65), निर्मलाबाई दुलाजी बोंबले (45) या दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर बाळू श्रीराम साबळे (27) याचा यवतमाळ येथे उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.
अपघातानंतर जखमी भाविकांना तातडीने माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. जखमींपैकी गंभीर असलेल्या गयाबाई सोनबा वाळके (55), वाहनचालक दीपक शेळके (27), डुलाजी कोंडीबा बोबडे (55), श्रावण वसंता मिराशे (35), तुळसाबाई बळीराम बोंबले (65), लिबुंबाई भिवाजी गुव्हाडे (65), बाळू श्रीराम साबळे (35), रेणुका झानेश्वर साबळे (35), श्रीराम सखाराम गुव्हाडे (49) यांना तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. यवतमाळ येथे नेताना बाळू साबळे याचा मृत्यू झाला.
इतर जखमी भाविक शकुंतला गुव्हाडे (50), शारदा गायकवाड (15), उषा गायकवाड (30), बारकुबाई बरगे (70), प्रतीक्षा इंगळे (16), बाबूराव गायकवाड (36), सुमन मिराशे (65), प्रमिलाबाई वाळवटे (70), अनुसया भालके (60), धुरपताबाई गावडे (60, सर्व रा.धनज) यांच्यावर माहूर येथे उपचार करण्यात येत आहेत.
या अपघातामुळे धनज गावावर शोककळा पसरली आहे. मृत रुखमाबाई वंजारे, निर्मलाबाई बोंबले व बाळू साबळे यांच्यावर धनज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: three pilgrim dies in accident near mahur