या जिल्ह्यातील तीन गावांना दरवर्षीच होतो पुराचा वेढा...पावसाळ्यात तुटतो संपर्क

जितेंद्र चन्ने
मंगळवार, 7 जुलै 2020

गोंदिया जिल्ह्यातील या तीन गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो. येथे कमी उंचीचे पूल असल्याने नागरिकांसह जनावरांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे बरीच जनावरे वाहून जात असतात. परिसरात मुसळधार पाऊस झाल्यास पुराचे पाणी ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. दोन-तीन दिवस गावाबाहेर पडता येत नाही.

पांढरी (जि. गोंदिया) : सडक अर्जुनी तालुक्‍यातील पांढरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणारी पैकनटोला, भोयरटोला व बकीटोला ही तीन गावे कित्येक वर्षांपासून पुराच्या विळख्यात सापडतात. पावसाळ्यात या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटत असतो. या गावांना जोडणारा पूल जुना असून कमी उंचीचा आहे; तरीही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

 

पैकनटोला, भोयरटोला व बकीटोला या तिन्ही गावांची लोकसंख्या 900 आहे. येथे 80 टक्के आदिवासी समाजबांधव वास्तव्यास आहेत. या गावांसाठी पुलाचे मोठे महत्त्व आहे. कारण मार्गक्रमण करण्याकरिता दुसरा पर्याय नाही.

 

तिघांना मिळाली होती जलसमाधी

काही वर्षांपूर्वी याच जीवघेण्या पुलावरून वाहत्या पुराच्या पाण्यामुळे लक्ष्मीबाई केवट (रा. पैकनटोला) यांची दहा वर्षांची मुलगी, बसुंधराव टेंभरे (रा. पैकनटोला) यांचा बारा वर्षांचा मुलगा; तर किसनलाल रहांगडाले (रा. गोंगले) यांची बारा वर्षांची मुलगी या तीन जणांना जलसमाधी मिळाली होती. दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे बरीच जनावरे वाहून जात असतात. परिसरात मुसळधार पाऊस झाल्यास पुराचे पाणी ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. दोन-तीन दिवस गावाबाहेर पडता येत नाही. त्यामुळे नागरिकांनामोठा त्रास सहन करावा लागतो.

विद्यार्थ्यांचे होते शैक्षणिक नुकसान

या परिसरातील विद्यार्थी पांढरी येथील शाळेमध्ये शिक्षणाकरिता येत असतात. पण बहुदा पुराच्या पाण्यामुळे त्यांना शाळेला बुट्टी मारावी लागते. त्यामुळे दरवर्षी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. पूल बांधकामाचे महत्त्व मोठे असताना याकडे गांभीर्याने अजूनही कोणाचे लक्ष गेले नाही. सरकारने या तीन गावांकडे लक्ष देऊन मोठ्या उंचीचे पूल बांधावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जाणून घ्या : वृक्षलागवडीसंदर्भात काय म्हणाले गोंदियाचे आमदार...वाचा सविस्तर

नवीन पुलाची मागणी
मी येथे नवीन पुलाची मागणी कित्येकदा केली आहे. सतत पाठपुरावा करून स्वत: प्रयत्न करीत आहे. लवकरच येथे नवीन पुलाला मंजुरी मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही संबंधित विभागाने दिली आहे.
- डी. यू. रहांगडाले, सरपंच, गोंगले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three villages in this district are surrounded by floods every year