पहाटे बेपत्ता झालेला वाघ सायंकाळी दिसला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

रामटेक - पवनी वनपरिक्षेत्रातील मोगरकसा भागात मंगळवारी पट्टेदार वाघ जखमी  असल्याचे कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली. सकाळी दहा ते रात्री उशिरापर्यंत वाघावर केवळ ‘लक्ष’ ठेवण्यात वनविभागाने धन्यता मानली. जखमी वाघावर उपचार करण्याचे सौजन्य वनविभागाने दाखवले नाही. बुधवारी पहाटेपासून जखमी वाघ बेपत्ता असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर वाघाच्या शोधासाठी वनविभाग आणि वनविकास महामंडळाने व्यापक मोहीम सुरू केली. पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास कैलुके यांनी वाघ सायंकाळी पाच वाजता दिसला असे सांगितले.

मंगळवारी (ता.८) पवनी वनक्षेत्रातील मोगरकसा भागात वनविकास महामंडळाच्या वनकक्ष क्र.४३९, ४४० मध्ये सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वनकर्मचाऱ्यांना वाघ दिसला. त्यांनी लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास कैलुके यांना माहिती दिली. लगेच कैलुके पथकासह तेथे दाखल झाले. दुसरे वनपरिक्षेत्र अधिकारी नाईक, रामटेकचे सहायक वनसंरक्षक विशाल बोऱ्हाडे यांनी घटनास्थळ गाठले. वाघासाठी एक बकरी बांधून ठेवण्यात आली. मात्र, वाघाने बकरीकडे पाहिलेसुद्धा नाही. वनकर्मचारी, अधिकारी वाघावर लक्ष ठेवून होते. वाघ पुढील डाव्या पायाने लंगडत चालत असल्याचे त्यांना दिसून आले. वाघ थोडे अंतर चालून बसत होता. 

थोड्या वेळाने परत पुढे जात होता. अशा प्रकारे त्याने संध्याकाळपर्यंत दहा जागा बदलविल्या. मात्र, तो जास्त  दूर जाऊ शकला नाही. तो वृद्ध असल्याचे नाईक यांनी सांगितले. ‘ओल्ड एज’ वाघाला काहीही करू नये, त्याला तसेच राहू द्यावे, (?) तसा नियम असल्याची माहिती मिळाली. 

रात्री वनविकास आणि वनविभागाची चमू वाघावर लक्ष ठेवून होती. मात्र, तरीही पहाटे वाघ कधी बेपत्ता झाला, हे कोणाच्याही लक्षात आले नाही. बुधवारी सकाळपासून परत जखमी वाघाच्या शोधासाठी धावाधाव सुरू झाली. जिल्हा वनसंरक्षक मल्लिकार्जुन यांनीही मोगरकसा यथील वनविभागाच्या विश्रामगृह येथून भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कैलास कैलुके यांनी सायंकाळी पाच वाजता वाघ दिसला असे सांगितले. दरम्यान, जखमी वाघाला बेशुद्ध करून औषधोपचार करावा, असा प्रश्‍न एकाही अधिकाऱ्याला कसा पडला नाही याचे आश्‍चर्य आहे.

Web Title: tiger