मोहफुले गोळा करण्यासाठी महिला गेली जंगलात अन्‌...वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

आरमोरी तालुक्‍यातील गणेशपूर येथील सिंधू बोरकुटे (वय 52) शुक्रवारी नेहमीप्रमाणे मोहफूल वेचण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेली. दरम्यान इंजेवारी येथून जवळच असलेल्या खोद तलावाजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात सिंधूचा जागीच मृत्यू झाला. मोलमजुरी करून ती आपल्या संसाराचा गाडा हाकत होती.

आरमोरी (जि. गडचिरोली) : मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना आरमोरी तालुक्‍यातील इंजेवारी गावालगत शुक्रवारी (ता. 24) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. सिंधू ऋषी बोरकुटे (वय 52) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. ती आरमोरी तालुक्‍यातील गणेशपूर येथील रहिवासी होती.

आरमोरी तालुक्‍यात आठवडाभरात वाघाने दोघांना ठार केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे मोहफूल, कुड्याची फुले तसेच सरपणासाठी जंगलात जाणाऱ्यांना मजुरांना मोठा धक्का बसला आहे.

सिंधू बोरकुटे (वय 52) आरमोरी तालुक्‍यातील गणेशपूर येथील रहिवासी होती. शुक्रवारी ती नेहमीप्रमाणे मोहफूल वेचण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेली. दरम्यान इंजेवारी येथून जवळच असलेल्या खोद तलावाजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात सिंधूचा जागीच मृत्यू झाला. मोलमजुरी करून ती आपल्या संसाराचा गाडा हाकत होती. सध्या मोहफुलाचा हंगाम असल्याने नागरिक पहाटेपासूनच जंगलात जात असतात. या हंगामातून अनेकांना रोजगार मिळतो.

वाघाने फरफटत नेले

महिलेवर वाघाने हल्ला केल्यानंतर तिला घटनास्थळापासून अंदाजे 40 ते 50 मीटर अंतरावर सिर्सी नजीकच्या वांद्री नाक्‍यापर्यंत फरफटत नेले. याच वेळी काही नागरिक मोहफूल गोळा करण्यासाठी जंगलात आले होते. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे वाघाने मृतदेह टाकून जंगलात धूम ठोकली.

वनाधिकाऱ्यांनी केला पंचनामा

या घटनेची माहिती मिळताच इंजेवारी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी डोंगरवार व वनरक्षक शेंडे, वनकर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील कार्यवाहीसाठी आरमोरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने लागलीच घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

जाणून घ्या : लॉकडाऊनमुळे कुत्र्यांवर आलीय हिरवा पाला खाण्याची वेळ

आरमोरी तालुक्‍यात आठवडाभरात दोन ठार

चार दिवसांपूर्वी आरमोरी लगतच्या जंगलात कुड्याची फुले आणण्यासाठी गेलेल्या एका नागरिकावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले होते. आठवडाभरात घडलेल्या दोन घटनांमुळे आरमोरी, सिर्सी, गणेशपूर, कोजबी, इंजेवारी परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचा मोहसंकलन तसेच शेतीच्या कामावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

असं घडलंच कसं : गुरांच्या चाऱ्याच्या गोवाळीत दिसला वाघाचा बछडा

रोजगारावर झाला परिणाम

विशेष म्हणजे महिलेला ठार केलेल्या परिसरात चार वर्षापूर्वी वाघाने एका व्यक्तीवर हल्ला करून त्यालासुद्धा ठार केले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा व आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन असल्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. मोहफूल, टेंभरू, चारोळी तसेच कुड्याची फुले संकलनातून रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, वाघाच्या दहशतीने आरमोरी तालुक्‍यात रोजगारावर परिणाम झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tiger attacks a woman collecting Mohful at gadchiroli