
नागभीडपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्राम्हणी गावात रविवारी (ता. 21) वाघ शिरला आणि त्याने एका झोपडीतच मुक्काम ठोकला. गावात वाघाने ठाण मांडल्याने गावकऱ्यांनी त्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली. गर्दी वाढत असल्याचे पाहून वाघोबाने झोपडीतून बाहेर पडून एका शेतकऱ्यावर हल्ला केला.
नागभीड (जि. चंद्रपूर) : माणसांच्या वस्तींच्या सीमा आपल्या मर्यादा पार करून जंगलांना भिडत आहेत, परिणामी जंगली श्वापदांचा नागरी वस्त्यांमध्ये आपोआपच शिरकाव होण्याच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. वाघ किंवा बिबटाचे माणसांवरील हल्ले ही नित्याचीच बाब झाली आहे. यात दोष कोणाचा, श्वापदांचा की माणसांचा? यासमोर मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. वन्यजीव प्रेमी आणि शासन तसेच शेतकरी यांच्यामध्ये याविषयावरून नेहमीच खडाजंगी झडत असते. मात्र घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशीच घटना नुकतीच नागभीडजवळ घडली.
नागभीडपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्राम्हणी गावात रविवारी (ता. 21) वाघ शिरला आणि त्याने एका झोपडीतच मुक्काम ठोकला. गावात वाघाने ठाण मांडल्याने गावकऱ्यांनी त्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली. गर्दी वाढत असल्याचे पाहून वाघोबाने झोपडीतून बाहेर पडून एका शेतकऱ्यावर हल्ला केला. शेवटी रात्री ताडोबा प्रकल्पातून रॅपिड टीम आली. या पथकाने वाघाला रात्री सव्वा दहा वाजता बेशुद्ध करून ताब्यात घेतले. या वाघाला नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला हलविण्यात आले आहे.
नागभीडपासून 10 किलोमीटर असलेले ब्राम्हणी गाव. जंगलाला लागूनच हे गाव आहे. रविवारी दुपारी 3 वाजता पट्टेदार वाघाने गावात प्रवेश केला. श्रीकांत देशमुख यांच्या गावाला लागून असलेल्या शेतातील झोपडीत वाघाने शिरकाव केला. बराचवेळ तिथे मुक्काम केला. झोपडीला लागून असलेल्या घराजवळील शेतात मनोहर पाल हे नांगरणी करीत होते. त्यांच्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
सविस्तर वाचा - का केली आयुक्त मुंढेविरुद्ध महापौर जोशींनी पोलिसात तक्रार? वाचा
गावात वाघ शिरल्याची माहिती वनविभागालाही देण्यात आली. घटनास्थळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड आपल्या संपूर्ण ताफ्यासह हजर झाले. झेप निसर्ग मित्र संस्थेचे पदाधिकारीही उपस्थित झाले. वनविभागाने वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, वाघ दडून बसलेल्या ठिकाणाहून जराही बाहेर निघाला नाही. वाघाला बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातील चार ते पाच हजार नागरिकांनी गर्दी केली होती. रात्री ताडोबा प्रकल्पातून रॅपिड टिम आली. या पथकाने वाघाला बेशुद्ध केले. जवळपास सहा तासांच्या प्रयत्नानंतर वाघ जेरबंद झाला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.