व्याघ्रगणनेचे काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नागपूर - महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि वन्यप्राण्यांचे अस्तित्व असलेल्या जंगलांमधील वाघांच्या गणनेचे काम पूर्ण झाले. संकलित केलेली माहिती, कॅमेरा ट्रॅपच्या छायाचित्राला अंतिम स्वरूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या १५ ते २० दिवसांत ते संपेल आणि १० मेपर्यंत ती संपूर्ण माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे (एनटीसीए) पाठविली जाईल.   

नागपूर - महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि वन्यप्राण्यांचे अस्तित्व असलेल्या जंगलांमधील वाघांच्या गणनेचे काम पूर्ण झाले. संकलित केलेली माहिती, कॅमेरा ट्रॅपच्या छायाचित्राला अंतिम स्वरूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या १५ ते २० दिवसांत ते संपेल आणि १० मेपर्यंत ती संपूर्ण माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे (एनटीसीए) पाठविली जाईल.   

राज्यात डिसेंबर २०१७ पासून व्याघ्रगणनेला सुरुवात झाली. त्याची आकडेवारी देशपातळीवर पुढील वर्षीच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने राज्यात सर्वच व्याघ्र प्रकल्पांसह इतरही गणना झालेल्या भूभागातील वाघ आणि वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचे पुरावे, खुणा आणि विष्ठांचे नमुने, कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रे आणि इतरही माहिती गोळा झाली. ती माहिती तातडीने पाठविण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयांनी संबंधितांना पाठविलेल्या आहेत. सर्वच व्याघ्र प्रकल्पांतील माहिती क्षेत्र संचालकांच्या कार्यालयात पोहोचली. कॅमेरा ट्रॅपसह इतर माहिती एनटीसीएने दिलेल्या तक्‍त्यांमध्ये भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते काम १५ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. त्यानंतर संपूर्ण माहिती एनटीसीएकडे पाठवली जाणार आहे. 

त्याला एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. व्याघ्रगणनेच्या वेळेस वनरक्षक आणि वनपालांनी जीपीएस आणि पीडीए वापरावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे गणना रखडली होती. वनरक्षक व वनपालांनी बहिष्कार मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्याघ्र गणना करण्यात आली. परिणामी, व्याघ्र गणनेच्या अहवालाचे काम रखडले होते. आता माहिती भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

राज्यातील व्याघ्रगणनेचे दोन्ही टप्पे पूर्ण झालेले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार यंदा वाघांच्या संख्येत वाढ अपेक्षित आहे. ती किती असेल हे सांगणे कठीण आहे. कारण एनटीसीएच्या मार्गदर्शनात देशपातळीवर ही गणना केली जाते. त्यामुळे राज्यातील संपूर्ण माहिती एनटीसीएकडे पाठविली जाईल. एनटीसीए भारतीय वन्यजीव संस्थेच्या मदतीनेचे त्याचा अभ्यास करेल आणि त्यानंतरच देशपातळीवरील वाघांची आकडेवारी पुढे येईल. तीही भूक्षेत्रानुसार आकडेवार सांगितली जाईल. 
- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पूर्व वन्यजीव)

Web Title: tiger counting