वाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार

Sudhir-and-Vijay
Sudhir-and-Vijay

नागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली. वडेट्टीवार यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमधील या मुद्यावरील मतभिन्नता समोर आली आहे. वाघापेक्षा माणसांचा जीव महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

अवनी वाघिणीने या परिसरातील १३ शेतकऱ्यांना ठार केले होते. यामुळे वनखात्याने या वाघिणीला ठार मारण्यासाठी शिकारी नवाब शाफत अली याला पाचारण केले होते. अवनीला ठार मारल्यानंतर वन्यप्रेमींनी विरोध सुरू केला. यावर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्य सरकारवर टीका केल्याने देशभरात राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तोफ डागली होती. परंतु, वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांच्या विरोधात भूमिका स्पष्ट केली व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कृतीचे समर्थन केले. वाघाच्या जीवापेक्षा शेतकऱ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. जंगलाच्या क्षेत्रातील शेतकरी जीव मुठीत घेऊन राहतात. वाघ जगला पाहिजे, ही भूमिका योग्य असली तरी वाघापेक्षा माणसांचा जीव महत्त्वाचा आहे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. 

संजय निरुपम यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तस्कराशी संबंध असल्याचा आरोप केला होता. अवनीच्या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून राज्य सरकारच्या कृतीचा निषेध केला होता. 
काँग्रेसचे सर्व नेते अवनीच्या समर्थनार्थ भाजपला घेरण्याचा प्रयत्न करीत असताना वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ बाजू घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

अवनी वाघिणीला मारण्याची पद्धत चुकीची होती, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. अवनीला बेशुद्ध करून पिंजऱ्यात ठेवले असते तरी पर्यटकांची संख्या वाढली असते, अशी सूचना त्यांनी केली. गेल्या तीन वर्षांत विदर्भात २६ वाघ मरण पावले. यासाठी राज्य सरकार जबाबदार आहे. वाघांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले. शेतकऱ्यांना पोट भरण्यासाठी जंगलात जावे लागते. 

सरकार त्यांना रोजगार देण्यात अपयशी ठरले आहे. वनखात्यासाठी स्वतंत्र मंत्र्यांची आवश्‍यकता असल्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावेळी किशोर गजभिये व काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

स्वयंसेवी संस्था झोळीछाप 
काही स्वयंसेवी संस्था झोळीछाप आहेत. त्यांनीच अवनी या वाघिणीला मुद्दा अधिक मोठा केला आहे. काँक्रिटच्या जंगलात राहणाऱ्यांना काय कळणार गाव खेड्यात राहणाऱ्यांचे जीवन आणि वाघांची दहशत, असा टोला हाणत वाघिणीला मारल्याचा बाऊ करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com