वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

धामणगावरेल्वे (जि. अमरावती)  : तालुक्‍यातील गावे गेल्या अनेक दिवसांपासून वाघाच्या दहशतीखाली आहेत. या नरभक्षक वाघाला पकडण्यात वनविभागाला अद्याप यश आले नाही. बकऱ्यांसाठी चारा आणावयास गेलेल्या अंजनसिंगी येथील मजूर मोरेश्‍वर वाळके (वय 45) यांचीही नरभक्षक वाघाने शिकार केली.

मोरेश्वर वाळके सोमवारी (ता. 22) सायंकाळी बकऱ्यांसाठी चारा आणायला शेतात गेले. परंतु परत न आल्यामुळे त्यांची रात्री शोधाशोध केली, पण थांगपत्ता लागला नाही. मंगळवारला सकाळी शरद राठी यांच्या शेताजवळील पनई नाल्यालगत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती कुऱ्हा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मृत मोरेश्वर वाळके हे अंजनसिंगीमध्ये मजुरी करीत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. गेल्या तीन दिवसांत नरभक्षक वाघाने दुसरा बळी घेतला. यापूर्वी येरली शिवारात निकडा जंगलात मंगरूळ दस्तगीर येथील शेतकरी राजेंद्र निमकर यांचा बळी घेतला होता.
वनविभागाचा दावा फोल?
वनविभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी अंजनसिंगी व पिंपळखुटा परिसरात तीन पिंजरे लावले आहेत; पण पिंजऱ्यात वाघ अद्याप अडकला नाही. कुठल्याही स्थितीत त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा वनविभागातर्फे दावा करण्यात येत असला तरी सद्यःस्थितीत हा दावा फोल ठरत असल्याचे दिसत आहे.

Web Title: tiger killed farmer