esakal | अमरावतीत वाघ, बिबटाची नखे जप्त; जळगाव जिल्ह्यातील तिघांना नांदुरात अटक
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावतीत वाघ, बिबटाची नखे जप्त; तिघांना नांदुरात अटक

अमरावतीत वाघ, बिबटाची नखे जप्त; तिघांना नांदुरात अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जळगाव जिल्ह्यातील तीन इसमांकडून वाघ आणि बीबटची काही नखे जप्त करण्यात आली. मोताळा वनपरिक्षेत्रात ही कारवाई झाली. वाइल्ड लाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो (डब्ल्यूसीसीबी), मेळघाट गुन्हे अन्वेषण विभाग यांच्यासह मोताळा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे पथक या मोहिमेत सहभागी होते. विशाल संजय पाटील, भागवत कांडेलकर व सागर गुलानकर अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Tiger-leopard-claws-seized-in-Amravati)

मोताळा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने बुलडाणा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही शनिवारपर्यंत (ता. १७) वनकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही मंडळी नांदुरा येथील हनुमान मूर्ती परिसरात वाघ, बिबटाची नखे विकण्यासाठी आली होती. तिघांना वनविभागाच्या पथकाने अटक केल्यावर बिबट, वाघाची नखे, दोन मोबाईल, एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधितांविरुद्ध वन्यजीवन अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा: दवाखान्यात गेली अन् गर्भवती निघाली; पालक पडले संभ्रमात

सहाय्यक वनसंरक्षक मेहकरचे संदीप गवारे, बुलडाणाचे सहाय्यक वनसंरक्षक रणजित गायकवाड, मुंबईच्या डब्ल्यूसीसीबीचे अदिमलय्या, वनपरिक्षेत्र अधिकारी के. डी. पडोळे, स्मिता राजहंस, गणेश टेकाडे, वनपाल पी. आर. मोरे, वनरक्षक एस. एच. पठाण, अमरावतीच्या वाइल्ड लाइफ क्राईम ब्युरोचे आकाश सारडा, मुकेश जावरकर, जीवन दहीकर, रामेश्वर आडे, संजय धिकार यांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते.

शिकार नेमकी केली केव्हा?

जप्त केलेली वाघ व बिबटाची नखे केव्हाची आहेत, त्यांनी केव्हा व कुठे वाघ आणि बिबटाची शिकार केली? यासंदर्भातील चौकशी सुरू असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. जी नखे जप्त केली ती नेमकी वाघ व बिबटची आहेत काय? याची खात्री करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञांकडून तपासणी केली जाईल. या तस्करांचा बोलविता धनी वेगळाच असल्याची शक्यता आहे.

(Tiger-leopard-claws-seized-in-Amravati)

loading image