सर्वांच्या नजरा चुकवून वाघोबा पसार; नदीच्या कपारीत होता अडकला

Tiger
Tiger

भद्रावती (जि. चंद्रपूर) : माजरी कोळसा खाणीच्या चारगाव खदानीजवळून वाहणाऱ्या शिराना नदीच्या पुलाखालील दगडात बुधवारी (ता. 6) दिवसभर वाघोबा फसून होता. त्याला काढण्यासाठी वनविभागाच्या चमूचे दिवसभर प्रयत्न सुरू होते. मात्र, सायंकाळी सात-साडेसात वाजताच्या सुमारास अंधार पडल्यावर वाघोबाने वनकर्मचाऱ्यांची नजर चुकवून तेथून जंगलात पलायन केले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

कोळसा खाणीपासून तयार झालेल्या पहाडावरून रस्ता ओलांडून हा वाघ शिराना नदीच्या पात्रात आला. त्याचवेळी त्याचा दगडावरून पाय घसरला आणि जखमी होऊन दोन दगडांच्या मधोमध फसला. नदीच्या पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आज सकाळी वाघ नदीजवळीत दगडी कपारीत फसून असलेला दिसला. ही माहिती गावात पसरली. त्यामुळे बघ्यांची पुलावर एकच गर्दी झाली. त्यानंतर वनविभागालाही याची माहिती देण्यात आली.

वाघाला वाचविण्यासाठी वनविभाग, पोलिस कर्मचारी, ताडोबा वन फोर्स, डब्ल्यूसीएल पथक आणि इको-प्रोचे पथक दिवसभर शर्थीचे प्रयत्न करीत होते. परंतु दिवसभर वाघाला बाहेर काढण्यात यश आले नाही. बचाव पथकात सब एरिया मॅनेजर वाल्मीक प्रसाद, सेक्‍युरिटी इन्चार्ज आर. के. करकाडे, सेक्‍युरिटी प्रफुल्ल आघात, सतीश बोडे, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, संदीप जीवने, पायल पाटील, शुभम मेश्राम, ओमदास चांदेकर, गौरव घोटेकर, प्रेमानंद पवार, राकेश बुरांडे, दीपक कवटे, डी. एन. गायकवाड, भगवान शिवरकर, मुन्ना मिश्रा यांचाही समावेश होता. हे सर्वजण वाघाच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत होते.

वाघाला पकडण्यासाठी पिंजराही लावण्यात आला. सायंकाळी हळूहळू अंधार पडायला लागला. याच अंधाराचा फायदा घेत सात-साडेसात वाजताच्या सुमारास वाघोबाने सर्वांच्या नजरा चुकवून जंगलाकडे पळ काढला. 

वाघोबाचा धुमाकूळ 
गेल्या काही दिवसांपासून या वाघोबाने परिसरात धुमाकूळ घातला होता. अनेकांची जनावरेसुद्धा फस्त केली होती. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com