चंद्रपुरातील वाघांची नव्या अधिवासात रवानगी

File photo
File photo

चंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता संरक्षित जंगलातही वाघांची संख्या झपाट्याने वाढली. त्यांना क्षेत्र अपुरे पडत आहे. त्यामुळे नवा अधिवास शोधताना वाघ आता अगदी शहराच्या वेशीवर येऊन ठेपले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मानव-वन्यजीव संघर्ष भविष्यात आणखी वाढणार आहे. तो टाळण्यासाठी काही वाघांना दुसऱ्या जंगलात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात चोहोबाजूंनी जंगल आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये पट्टेदार वाघांची संख्या मोठी आहे. सन 2016 च्या प्रगणनेनुसार कोअर आणि बफरमध्ये वाघांची संख्या 88 च्या घरात नोंदविण्यात आली. संरक्षित क्षेत्रातही वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षितक्षेत्र मिळून आजच्या घडीला जवळपास दोनशे वाघ जिल्ह्यात आहेत. यात बछड्यांची संख्या अधिक आहे. यातील बरेच बछडे शिकार करण्यायोग्य झाले आहेत. त्यामुळे ते स्वतःसाठी सुरक्षित आणि योग्य अधिवासाची निवड करण्यासाठी बाहेर पडू लागलेत. अनेक वाघ आता गावाशेजारी स्थिरावले आहेत. त्यातून लोकांवर हल्ले वाढले आहेत. मागील पंधरा दिवसांत पाच लोकांचे बळी वाघाने घेतले. त्यामुळे वनविभागाला रोज लोकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागत आहे. ही आणीबाणीची स्थिती टाळण्यासाठी आता राज्याच्या वनविभागाने एक निर्णय घेतला आहे. वाघांना देशातील दुसऱ्या वनक्षेत्रात हलविण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी वनविभाग अभ्यासपूर्ण अहवाल तयार करीत आहे. तो लवकरच राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे (एनटीसीए) पाठवला जाणार आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावर कार्यवाही केली जाणार आहे.
आजवर वाघांचे हल्ले टाळण्यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या. विद्युत तारेचे कुंपण शेतकऱ्यांना देण्यात आले. व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यात आले. गावकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले. लाकडे तोडण्यासाठी लोकांना जंगलात जावे लागू नये, यासाठी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत कनेक्‍शन देण्यात आले.
आता राज्याचा वनविभाग जो अहवाल तयार करीत आहे, त्यात वेगवेगळ्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास असेल. वाघांना तिथे हलवण्यायोग्य वातावरण आहे की नाही, पुरेसे भक्ष्य आणि सुरक्षित अधिवास याचा त्यात समावेश आहे. हा संपूर्ण अहवाल एनटीसीएकडे सोपवल्यावर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे. तसा निर्णय झाला, तर वाघांना हलवण्याचा हा प्रयत्न देशातील पहिलाच प्रयत्न ठरेल.

वाघांची संख्या वाढली आहे. त्यांना दुसऱ्या क्षेत्रात हलविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले. वाघांना दुसऱ्या क्षेत्रात स्थलांतरित केल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केला जाईल. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे तो अहवाल जाईल. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर वाघांना हलविण्याचा निर्णय होईल.
- सुधीर मुनगंटीवार, अर्थ व वनमंत्री, महाराष्ट्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com