"माया'च्या आगमाने पर्यटक धास्तावले... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

चंद्रपूर - पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या जिप्सीसमोर अचानक वाघीण आली. पर्यटक धास्तावले. वाघीण वाहनात उडी मारण्याच्या तयारीत. मात्र जिप्सीचालकाने प्रसंगावधान दाखविले आणि वाहन सुसाट वेगाने पळवून सुटका करून घेतली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ही दोन दिवसांपूर्वीची घटना. यामुळे पर्यटक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. 

ताडोबा-अंधारी प्रकल्पात व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. उन्हाळ्यामुळे वाघोबांचे दर्शनसुद्धा सुलभ झाले आहे. सकाळी कोवळ्या उन्हात आणि दुपारी उन्हं उतरल्यावर वाघोबांच्या दर्शनामुळे पर्यटक खूष होतात. मात्र ताडोबातील हिलटॉप भागातील एका घटनेमुळे पर्यटक मात्र चांगलेच धास्तावले. या भागात "माया' नामक वाघिणीने पर्यटक जिप्सी निरखून चक्क चढाईची तयारी केली आणि पर्यटकांची घाबरगुंडी उडाली. माया गाडीवर उडी घेण्याच्या तयारीत असताना गाडीत बसलेल्या पर्यटकांना मात्र चांगलाच घाम फुटला. मायाच्या मागे चालत येणाऱ्या बछड्यांसाठी कदाचित आईने मार्ग मोकळा करून दिला असेल. माया आणि बछडे यांचे हे कुटुंब पर्यटकांनी डोळ्यांत साठविले. मात्र मायाचा आक्रमक मूड ओळखून जिप्सीचालकाने सफाईदारपणे वाहन पुढे नेले आणि घटना टळली. काही हौशी पर्यटकांनी या घटनेचे चित्रीकरण केले. मात्र या घटनेमुळे पर्यटकांच्या मनात चांगलीच धास्ती निर्माण झाली. वाघाचे दर्शन सुरक्षित अंतर ठेवून झालेले बरे, असे भाव चेहऱ्यावर दिसत होते. 

Web Title: tigress in front of the tourist gypsy