सर्वच सरकारी कर्मचारी कामचुकारपणा करीत नाही; हे आहे उत्तम उदाहरण...

Time to sit with umbrella on Gram Panchayat Secretary
Time to sit with umbrella on Gram Panchayat Secretary

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : शासकीय कार्यालयातील बरेच कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळतात. परंतु, पावसाळ्यात कार्यालयाचे छत गळत असतानाही चांदूररेल्वे तालुक्‍यातील घुईखेड येथील ग्रामपंचायतचे सचिव छत्री घेऊन कार्यालयात बसून आपले कार्य पूर्ण करीत आहेत. घुईखेड ग्रामपंचायतला नवीन पुनर्वसनामध्ये अद्यापही जागा वा बांधकामासाठी पैसा मिळाला नसल्याने इमारतीची दुर्दशा झाली आहे. 

चांदूररेल्वे तालुक्‍यातील घुईखेड या गावाचे पुनर्वसन 2008 मध्ये झाले. काही अंतरावरच नवीन घुईखेड गाव वसले. मात्र, अजूनही समस्या कायमच आहेत. अशातच घुईखेड ग्रामपंचायत कार्यालयासाठी बेंबळा प्रकल्प विभागाकडून अद्यापही भूखंड मिळाला नसून बांधकामाकरिता पैसेसुद्धा मिळालेले नाहीत. त्यामुळे जुन्याच ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये कामकाज सुरू आहे.

पावसाळ्यात छत गळत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना येथे काम करणेही कठीण झाले आहे. ग्रामपंचायत सचिव संजय शिरसाट यांना कार्यालयीन काम करीत असताना चक्क डोक्‍यावर छत्री ठेवावी लागत आहे. छिद्रे पडल्याने छतातून पाणी थेट ग्रामपंचायत कार्यालयात येते. त्यामुळे छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे. बेंबळा प्रकल्प विभागाकडून ग्रामपंचायतच्या इमारतीसाठी अद्यापही भूखंड व पैसे न मिळाल्यामुळे जुनी इमारत दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. 

लवकरच दुरुस्तीचे काम करू
जून महिन्यापासून छत गळत असल्याने कार्यालयात काम करणे अडचणीचे झाले आहे. 2019-20 मध्ये ग्रामपंचायत दुरुस्तीचे काम 14 व्या वित्त आयोगातून प्रस्तावित आहे. त्यामुळे मी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी घेऊन काम करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच दुरुस्तीचे काम करू. 
- संजय शिरसाट, सचिव.

पाच वेळा पत्रव्यवहार

सरपंच असताना दोन वर्षांत चार ते पाच वेळा बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतच्या जागेबाबत पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांच्याकडून एकाही पत्राचे उत्तर मिळाले नाही. तसेच पुनर्वसनामध्ये ग्रामपंचायत इमारतीसाठी भूखंड व इमारत बांधण्यासाठी पैसे अद्यापही मिळाले नसल्याचे माजी सरपंच विनय गोटेफोडे यांनी सांगितले. 

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com