किराणा दुकानांमधून नियम डावलून सुरू आहे या वस्तूंची विक्री

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

किराणा दुकाने ही अत्यावश्‍यक सेवेमध्ये येत असल्याने त्यांना विशिष्ट कालावधीसाठी सुरू ठेवण्याची परवानगी आहे. पण, याचा गैरफायदा घेत अनेक दुकानदार खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत आहे

गडचिरोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने वर्षभरासाठी सर्वच प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. असे असतानाही किराणा दुकानांतून त्याची विक्री होत आहे. अशा किराणा दुकानांची पोलिस पाटील आणि मुक्तिपथ गाव संघटनांच्या सहकार्याने झडती घेत मुक्तिपथ तालुका कार्यकर्त्यांनी अनेक दुकानांतून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून नष्ट केले.
जिल्ह्यात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. अत्यावश्‍यक सेवा, सुविधा वगळता व्यापारी प्रतिष्ठाने पूर्णतः बंद आहेत. वर्षभरासाठी पानठेले बंद ठेवण्याचेही आदेश आहेत. किराणा दुकाने ही अत्यावश्‍यक सेवेमध्ये येत असल्याने त्यांना विशिष्ट कालावधीसाठी सुरू ठेवण्याची परवानगी आहे. पण, याचा गैरफायदा घेत अनेक दुकानदार खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत आहे. विशेष म्हणजे या वस्तूचा तुटवडा असल्याने त्याची चढ्या भावाने विक्री होत आहे. शहरातील किराणा दुकानांवर पोलिसांची करडी नजर असल्याने येथील विक्री बंद असली तरी ग्रामीण भागात ही विक्री सुरू असल्याचे आढळून आले. ही बाब विविध तालुक्‍यातील मुक्तिपथ कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गावांमधील अशा दुकानांची गाव संघटना आणि पोलिस पाटलांच्या सहकार्याने छापा टाकून तंबाखूजन्य साहित्य जप्त करून नष्ट केले. आरमोरी तालुक्‍यातील कुरूंझा आणि पळसगाव येथील किराणा दुकानांमध्ये तपासणी केली असता सुगंधित तंबाखू व इतरही साहित्य सापडले.                        त्याचबरोबर पानठेलाधारकांच्या घराची झडती घेतली असता तिथेही मुद्देमाल सापडला. हे सर्व साहित्य नष्ट करण्यात आले. किराणा दुकाने अत्यावश्‍यक सेवेत येत असली, तरी दुपारी 12 पर्यंतच ती सुरू ठेवण्याची परवानगी आहे. पण, गावांमध्ये या नियमाला डावलून दिवसभर दुकाने सुरू असतात व त्यातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. गडचिरोली तालुक्‍यातील पोटेगाव आणि काटली येथील किराणा दुकानांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात मझा सुगंधित तंबाखू व सिगारेटची पाकिटे सापडली. अहेरी तालुक्‍यात महागाव बू आणि महागाव खुर्द येथील तब्बल 21 दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आवाहन केले. तीन दुकानात सापडलेले साहित्य नष्ट केले.

सविस्तर वाचा - अरे हे काय झालं; पोलिसदादांची धावपळ सुरू अन् अंगावर उठला  काटा                                                             चामोर्शी तालुक्‍यात पावीमुरांडा या गावी 7 दुकानांची तपासणी केली. 2 दुकानांमध्ये सापडलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा त्यांनी नष्ट केला. वडसा तालुक्‍यातील तुळशी या गावी एका दुकानातून गुडाखूचा मोठा साठा जप्त केला. भामरागड तालुक्‍यातील कुक्कामेटा या गावी दुकानदारांना समज देत तंबाखूजन्य पदार्थ व खर्रा बनविण्याचे साहित्य जप्त केले. किराणा दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करावी आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुक्तिपथने केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tobbaco selling is going on in groccery shop