Diwali Festival 2020 : दिवाळी सणाचा शुभारंभ, काय आहे वसुबारसचं महत्त्व?

दिनकर गुल्हाने
Thursday, 12 November 2020

वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस. अंगणात रांगोळी व सायंकाळी पाडसासोबत गाईची पूजा केली जाते. हिंदू संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा आहे. देवादिकांचा वास गाईच्या शरीरात असल्याचे मानले जाते. हा अध्यात्मिक भाग सोडला तरी शेती धर्मात पशुधनाचे महत्त्व मोठे आहे.

पुसद (जि. यवतमाळ): कृषी संस्कृतीत दिवाळी सणाचे महत्व आगळेवेगळे आहे. खरीप हंगाम हाताशी येतो. धन-धान्याची समृद्धी लाभते आणि बळीराजाच्या आनंदाला पारावार उरत नाही. यंदा खरीपाने हात दिला नसला, तरी थंडीची किनार लाभलेला दिवाळी सण आज गुरुवारी (ता.12) 'वसुबारस'ने सुरू होत आहे.

वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस. अंगणात रांगोळी व सायंकाळी पाडसासोबत गाईची पूजा केली जाते. हिंदू संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा आहे. देवादिकांचा वास गाईच्या शरीरात असल्याचे मानले जाते. हा अध्यात्मिक भाग सोडला तरी शेती धर्मात पशुधनाचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळेच पशुधनाचा आदर करण्यासाठी गोमाता व तिच्या पाडसाची पूजा करण्याची प्रथा पूर्वापार जोपासली आहे.

हेही वाचा - हॉटेल, लॉज मालकांनो रेकॉर्ड अपडेट ठेवा; अन्यथा होणार...

दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसेला सकाळी अंगणात रांगोळी व सायंकाळी तेलाचे दिवे लावण्यात येतात. यावेळी पाडसासह गाईचे  पूजन करण्यात येते. गाई-गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन. त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

वसुबारस, धनत्रयोदशी, नकरचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज यानुसार दिवाळी साजरी केली जाते. घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भयनिवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे.

हेही वाचा - महाविकास आघाडीत बिघाडी; काँग्रेसने उमेदवार दिल्यावरही...

वसुबारसेच्या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. घरी गुरे, वासरे असणाऱ्या शेतकऱ्यांकडे या दिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सुवासिनी गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. बऱ्याच महिला वसुबारसेला उपवास करतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

हेही वाचा -

कामधेनू पूजन! -
समुद्रमंथनात पाच कामधेनू प्राप्त झाल्यात, अशी आख्यायिका आहे. त्यापैकी 'नंदा' या कामधेनुचे व्रत पाळले जाते. तिचे स्मरण व पूजन केल्याने अनेक जन्माच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. थोडक्‍यात, कृषी संस्कृतीत गोधनाला खूप महत्त्व आहे. गाईपासून दूध, दही, लोणी, ताकशिवाय शेण आणि मूत्र या उपयुक्त गोष्टी मिळतात. घराला सुखसमृद्धी लाभते. म्हणूनच गोधन पूजनाचा दिवाळीच्या पहिल्या दिवसाला मान आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today is wasubaras celebration