प्रसाधनगृहात स्वच्छतेची दाणादाण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नागपूर - शहरातील अनेक प्रसाधनगृह सुलभ इंटरनॅशनलला चालविण्यास दिली असून, बहुतांश प्रसाधनगृहात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. विदर्भाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या इतवारी शहीद चौकातील सुलभ प्रसाधनगृहात अस्वच्छतेमुळे महिलांचीही कोंडी होत आहे. परिसरात दारूच्या बॉटलांचा खच आढळल्याने रात्री येथे असामाजिक तत्त्वांचा वावर असल्याचेही उघडकीस आले. 

नागपूर - शहरातील अनेक प्रसाधनगृह सुलभ इंटरनॅशनलला चालविण्यास दिली असून, बहुतांश प्रसाधनगृहात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. विदर्भाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या इतवारी शहीद चौकातील सुलभ प्रसाधनगृहात अस्वच्छतेमुळे महिलांचीही कोंडी होत आहे. परिसरात दारूच्या बॉटलांचा खच आढळल्याने रात्री येथे असामाजिक तत्त्वांचा वावर असल्याचेही उघडकीस आले. 

पालिकेने स्वच्छता सर्वेक्षणात मागील वर्षाच्या तुलनेत मानांकनात सुधारणा केली. मात्र, अद्यापही पहिल्या दहा शहरात स्थान मिळविण्यात अपयश आले. शहरातील सुलभ प्रसाधनगृहाची दुरवस्था बघितल्यास पहिल्या दहातील क्रमांक स्वप्नच ठरणार असल्याचे चित्र आहे. प्रभागाच्या नगरसेविका आभा पांडे यांनी इतवारी शहीद चौकातील सुलभ प्रसाधनगृहाची पाहणी केली. यात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. 

सुलभ शौचालयाच्या परिसरात दारूच्या बॉटल्यांचा खच आढळला. एवढेच नव्हे महिलांसाठी असलेल्या प्रसाधनगृहात घाण कपड्यांचा ढिगारही आढळला. प्रसाधनगृहातील टाइल्स फुटल्या असून, संडास शीटही तुटल्या आहेत. एवढेच नव्हे बाहेरून येणाऱ्या नागरिकांकडून लघुशंकेसाठी पैसे उकळले जात असल्याचे नगरसेविका आभा पांडे यांनी सांगितले. महाराणा प्रताप सुलभ प्रसाधनगृहाची स्थितीही अशीच असल्याचे आढळले. 

"सुलभ'ला दोन नोटीस 
प्रसाधनगृहातील अनियमिततेबाबत सुलभ प्रसाधनगृह व्यवस्थापनाला दोनदा नोटीस दिल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने नमूद केले. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करून "सुलभ'ने महापालिकेला वाकुल्या दाखविल्याचे दिसून येत आहे. 

वृद्ध सांभाळतात व्यवस्थापन 
येथे व्यवस्थापनासाठी तरुणाची नियुक्ती केली होती. मात्र, हा तरुण वृद्ध वडिलांना येथे बसवून दुसरीकडे नोकरी करीत असल्याचेही उघडकीस आले. यातून सुलभ व्यवस्थापनाची बेजबाबदारीही पुढे आली. 

दत्तात्रयनगर उद्यानातही गैरसोय 
शहरातील दत्तात्रयनगर उद्यानातील नव्यानेच बांधलेले सुलभ प्रसाधनगृह कधी बंद तर कधी सुरू असते. त्यामुळे येथे सकाळ व सायंकाळी फिरण्यास येणाऱ्या महिलांना झुडपाचा आधार घ्यावा लागत असल्याचे अनेकदा दिसून आले. 

शहीद चौकातील प्रसाधनगृहात महिलांसाठी वेगळा कक्ष आहे. मात्र, त्यांना तेथे जाऊ दिले जात नाही. महाराणा प्रताप प्रसाधनगृहात असामाजिक तत्त्वाचा वावर असून, याप्रकरणी उपायुक्तांना तक्रार केली आहे. 
- आभा पांडे, नगरसेविका.

Web Title: Toilet cleanliness issue